The women shouted Elgar | महिलांनी पुकारला एल्गार

महिलांनी पुकारला एल्गार

ठळक मुद्दे४६ बाटल्या जप्त : नरसिंहपल्लीत महिलांची दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील नरसिंहपल्ली येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी दोन दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून जवळपास २७ हजार रूपयांचा देशी, विदेशी व गावठी दारूचा साठा जप्त केला. दारूच्या तब्बल ४६ बाटला महिलांनी ताब्यात घेतल्या.सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई झाली. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर रेगुंठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
नरसिंहपल्ली येथील महिला दारूविक्री बंद करण्यासाठी एकवटल्या आहेत. गावात दारूबंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. असे असतानाही जवळपास पाच विक्रेते तेलंगणा येथून दारूची तस्करी करून चोरून लपून विक्री करतात. विक्रेत्यांना अनेकदा नोटिस देण्यात आली आहे. तसेच विक्रेत्यांविरोधात तक्रारीचे निवेदन देऊन गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणीही महिलांनी पोलिसांना केली आहे. असे असतानाही दारूची विक्री सुरूच आहे.
गावातील पाच जणांनी विक्रीसाठी दारू आणल्याची माहिती मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यांनी मुक्तिपथ तालुका चमुला याची माहिती देत सोमवारी सकाळी यासंदर्भात बैठक घेतली. बैठकीत दारूची विक्री रोखण्यासाठी चर्चा झाली. पाचही विक्रेत्यांच्या घराची झडती घेण्याचा निर्णय महिलांनी घेतला यातील तीन घराला कुलूप होते. दोन घरांच्या झडतीमध्ये इंपेरियल ब्लु कंपनीच्या एकूण २४, किंगफिशर कंपनीच्या १७ आणि रोयल स्टॅग कंपनीच्या ५ अशा एकूण ४६ बाटला महिलांनी जप्त केल्या. सोबतच तीन हजाराची गुळाची दारूही ताब्यात घेतली. एकूण २७ हजार ७४० रूपयांचा दारूसाठा महिलांनी पकडला. रेगुंठा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचमाना केला व मुद्देमाल ताब्यात घेतला. रेगुंठा पोलीस स्टेशनपासून दोन किमी अंतरावर नरसिंहपल्ली गावात दारूची तस्करी आणि विक्री होत आहे. पोलिसांनी धाडसत्र राबवून विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला करीत आहे.

Web Title: The women shouted Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.