महिला पोलिसांनी सांभाळला अहेरी ठाण्याचा कारभार
By Admin | Updated: March 9, 2016 02:28 IST2016-03-09T02:28:34+5:302016-03-09T02:28:34+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी अहेरी पोलीस ठाण्याचा भार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर देण्यात आला होता.

महिला पोलिसांनी सांभाळला अहेरी ठाण्याचा कारभार
महिला दिनाचे औचित्य : कर्तव्य व जबाबदारीने सारेच काम पार पाडले
अहेरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी अहेरी पोलीस ठाण्याचा भार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर देण्यात आला होता. दिवसभर सर्व जबाबदाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडल्या.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी महिलांवर ठाण्याची धुरा देण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याची डायरी लिहिणे, न्यायालयीन कामे, रुग्णालयाचे कामे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे, परीक्षा केंद्राला सुरक्षा पुरविणे, महाशिवरात्री यात्रेचा बंदोबस्त, सकाळ व सायंकाळची गिनती संचालन, अदाखलपात्र गुन्हे, दैनंदिन कार्यालयीन कामे हे सारे सोपस्कर महिला पोलीस शिपायांनी आपल्या खांद्यावर घेतले व कुठल्याही पुरूष कर्मचाऱ्याची मदत न घेता, त्यांनी हे सर्व कर्तव्य पार पाडले.
पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व महिला कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. पोलीस प्रशासनाचे कामकाज, त्याप्रती आपली जबाबदारी व कर्तव्य याबाबत मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपनिरीक्षक दिडवाघ, साळुंखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)