जीव धोक्यात घालून पोहोचावे लागते बिनागुंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:54 IST2017-08-21T22:53:54+5:302017-08-21T22:54:20+5:30

भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही.

Without risking life, you have to reach it | जीव धोक्यात घालून पोहोचावे लागते बिनागुंडात

जीव धोक्यात घालून पोहोचावे लागते बिनागुंडात

ठळक मुद्देनाल्यावर पूल नाही : आरोग्य कर्मचाºयांचीही कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे नाल्यातील पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विकासापासून कोसोदूर असलेल्या बिनागुंडासह परिसरात रस्ते व पूल निर्मितीकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बिनागुंडा हे गाव अतिशय दुर्गम भागात वसले आहे. बिनागुंडाच्या सभोवताल पहाडी आहेत. बिनागुंडा हे गाव लाहेरीपासून १८ किमी अंतरावर आहे. लाहेरीपासून बिनागुंडाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. वाटेत पाच नाले पडतात. यापैकी एकाही नाल्यावर पूल नाही. लाहेरीपासून सात किमी अंतरावर गुडेनूर नाला आहे. सदर नाला अतिशय मोठा आहे. जंगलातून पाणी येत असल्याने सदर नाला जवळपास आठ महिने भरून राहतो. पावसाळ्यात या नाल्याला अनेकदा पूर येते. तर पावसाळ्यानंतरही या नाल्यांमध्ये कंबरेपेक्षा अधिक पाणी राहते. या नाल्याच्या पाण्यातून पुढे जाताना जीव दावणीलाच लावावा लागतो. मात्र सदर नाला ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. सदर नाल्यापासून ११ किमी अंतरावर डोंगर आहे. तीन ते चार तास पहाडी चढून बिनागुंडाला जावे लागते. एकदा बिनागुंडाला गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये तेथून परत येणे शक्य होत नाही. बिनागुंडा ते लाहेरीपर्यंत पायवाट असल्याने १८ किमी अंतर पायदळच तुडवावे लागते. बिनागुंडा परिसरात कुनाकोडी, फोदेवाडा, पुंगासूर, धामनमरका, पेरमिली, भट्टी आदी गावे आहेत. या सर्व गावातील शेकडो नागरिकांना वर्षभर असाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शासन या गावांना पक्का रस्ता कधी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
आरोग्य सेवा देताना कसरत
बिनागुंडा, फोदेवाडा, कुनाकोडी येथे आरोग्य उपकेंद्र असून या उपकेंद्राच्या माध्यमातून बिनागुंडा परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. बिनागुंडा उपकेंद्रात डॉ. मेश्राम व एएनएम अल्का मेश्राम, कुनाकोडी येथे एएनएम एलबी लेखामी आणि फोदेवाडा येथे मंगला कुळमेथे व एमपीडब्ल्यू विश्वनाथ कोडापे हे कर्मचारी कार्यरत आहेत. जंगलानी व्यापलेली गावे असल्याने या ठिकाणी मलेरियाचा प्रकोप अधिक राहते. त्यामुळे हे सर्व कर्मचारी मुख्यालयी राहूनच सेवा देतात. एखादेवेळी गावाकडे जायचे असल्यास किंवा भामरागड येथून औषधी आणायची असल्यास याही आरोग्य कर्मचाºयांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.

Web Title: Without risking life, you have to reach it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.