मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST2022-05-25T05:00:00+5:302022-05-25T05:00:50+5:30

देसाईगंज तालुक्यातील खरीप धान पीक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धान पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस आणि पावसाचे दिवस यात समानता नाही. पाऊस जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पडल्यास पेरणी, कापणी वेळेवर होत असते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पाऊस पडण्यात अनियमितता दिसून येते. 

Will there be as much rain this year as last year? | मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय?

मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय?

लाेकमत न्यूज  नेटवर्क
देसाईगंज : २०१७ ते २०२१ पर्यंतच्या पाच वर्षांतील पावसाच्या आकडेवारीनुसार देसाईगंज तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १४१०.२ मिलिमीटर आहे. मागील वर्षीएवढा पाऊस यावर्षी पडणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 देसाईगंज तालुक्यातील खरीप धान पीक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धान पिकाला भरपूर पाणी आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी पडलेला पाऊस आणि पावसाचे दिवस यात समानता नाही. पाऊस जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पडल्यास पेरणी, कापणी वेळेवर होत असते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पाऊस पडण्यात अनियमितता दिसून येते. 
हंगामात मोजके दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्याने पिकावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. पेरणी झाल्यावर पाऊस पडला नाही तर धान नर्सरी करपून दुबार, तिबार पेरणीचे संकट येते. 
मागील वर्षी मृग नक्षत्राच्या प्रत्येक दिवशी पाऊस आला. आर्द्राच्या अखेर पाऊस पडल्याने चिखलात पेरणी सुरू झाली. मात्र, मध्यंतरी ऐन रोवणीच्या वेळी मोठी धावपळ करावी लागली. पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा हे चारही नक्षत्र बहुतेक कोरडे गेले. अखेर पूर्वा आणि उत्तराने उत्तम साथ दिल्याने धान पीक तरले. जलसाठे पण भरले. परंतु, ऑक्टोबर महिन्यापर्यंत चाललेल्या पावसाने कापणीच्या वेळेस धान पिकाची फारच कठीण परिस्थिती निर्माण केली होती. 
यावर्षी हवामान खात्यानी पावसाचे प्रमाण भरपूर राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरला तर काेरड्या दुष्काळाचे संकट निर्माण हाेणार नाही. एवढे मात्र निश्चित.

२०१७ मध्ये पडला केवळ ५८ टक्के पाऊस 
-    देसाईगंज तालुक्यात २०१७ ते २०२१ या पाच वर्षांत पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास सन २०१९ ला सर्वाधिक १८३९.६ मिलिमीटर, वर्ष २०१७ मध्ये सर्वांत कमी ९११.६  मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी ६९ दिवस पडलेल्या पावसाचे एकूण पर्जन्यमान १३१३ मिमी म्हणजेच ९३.११ टक्के होते. गेल्या पाच वर्षामध्ये प्रत्येक वर्षी पडलेल्या पावसाच्या दिवसांचा विचार केल्यास वर्ष २०१९ मध्येच सर्वांत जास्त ७५ दिवस, तर वर्ष २०१८ मध्ये केवळ ४९ दिवस पाऊस पडला.

हलक्या व मध्यम जातीच्या वाणाला पसंती
-    गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमी आहे. हा अनुभव पाहता, काही शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात हलक्या व मध्यम जातीच्या अर्थात कमी मुदतीच्या धानाच्या वाणाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. 
-    कृष विभागाचे कार्यालय तसेच विविध ठिकाणच्या कृषी केंद्रात जाऊन धान पिकाच्या वाणाबाबत आत्तापासूनच माहिती जाणून घेत आहेत. कमी मुदतीचे व भरपूर उत्पादन देणाऱ्या वाणांची आर्डर दिली आहे.

 

Web Title: Will there be as much rain this year as last year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.