जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविणार
By Admin | Updated: January 17, 2016 01:18 IST2016-01-17T01:18:08+5:302016-01-17T01:18:08+5:30
भाजप पक्षाच्या वतीने आपली पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढविणार
पत्रकार परिषद : अशोक नेते यांची माहिती
गडचिरोली : भाजप पक्षाच्या वतीने आपली पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. खासदार म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे मुळीच दुर्लक्ष न करता येत्या तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात भाजपचे पक्ष संघटन वाढविण्यावर आपला भर राहिल, अशी माहिती भाजपचे नवनिवयुक्त गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी शनिवारी सर्कीट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाध्यक्ष पदावर आपली बिनविरोध निवड झाल्यामुळे पक्ष संघटनेबाबत माझ्यावरील जबाबदारी दुपटीने वाढली आहे. येत्या तीन वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. सोबतच लोकसभा व विधानसभाही निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकीत माझ्या नेतृत्वात भाजप पक्षाच्या वतीने लढविण्यात येईल, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले. जिल्ह्याचे भाजप पक्षात माझ्या नेतृत्वात कोणतीही गटबाजी राहणार नाही. सर्वांना सोबत घेऊन पूर्ण प्रामाणिकपणे आपण जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देणार, असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्नावर आपण गतीने पाठपुरावा करणार, असेही ते म्हणाले. माझ्या नेतृत्वात भाजपची जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात येणार असून सर्व आघाड्या व सेलच्या पदावर जुन्या, नव्या नेत्यांना संधी देऊन पक्ष संघटनेत समानता आणण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे ते यावेळी म्हणाले.
पत्रकार परिषदेला आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, रामेश्वर सेलुकर, नाना नाकाडे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, सुधाकर येनगंधलवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)