३४ हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:44+5:30
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.

३४ हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण १४४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ३४ निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खून केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांच्या हत्त्येसह शासकीय मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या सृजनक्कासाठी नक्षलवाद्यांनी २० मे रोजी बंद पुकारला आहे. आदिवासींचा खून करणाऱ्या सृजनक्कासाठी हा बंद का म्हणून पाळायचा, असा सवाल जिल्ह्यातील संतप्त नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.
एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना संकटाचा सामना करीत असून या लढ्यात पोलिसांसोबतच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
असे असताना सुद्धा दुसरीकडे नक्षलवाद्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडेपाडून रस्ता बंद करतात. परिणामी नागरिकांना जीवनावश्यक सेवेसोबतच आरोग्य सेवा मिळणे कठीण होते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन अडचणीत आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून होत आहे, असे पोलीस विभागाने म्हटले आहे.
नक्षल्यांकडून आजपर्यंत ५३३ नागरिकांची हत्या
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उदय झाल्यापासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील एकूण ५३३ सामान्य आदिवासी नागरिकांची हत्या केली. यामध्ये निष्पाप २२ महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली जनतेच्या पैशातून उभा करण्यात आलेल्या मालमत्तेची नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न नक्षलवादी करीत असतात. बंदच्या नावाखाली वाहनांची केलेली जाळपोळ घटना ही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून खंडणी उकळणे हा नक्षलवाद्यांचा सदर जाळपोळ घटनेच्या माध्यमातून उद्देश असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.