रस्त्यांची वाट लावण्यासाठी जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:43+5:302021-03-16T04:36:43+5:30
रस्त्याच्या मधोमध गटार लाइनसाठी खोदकाम केल्यानंतर त्याच मातीने खोदलेली जागा बुजविली जात आहे. हे करताना केवळ माती ढकलण्याचे काम ...

रस्त्यांची वाट लावण्यासाठी जबाबदार कोण?
रस्त्याच्या मधोमध गटार लाइनसाठी खोदकाम केल्यानंतर त्याच मातीने खोदलेली जागा बुजविली जात आहे. हे करताना केवळ माती ढकलण्याचे काम केले जाते. त्याची दबाईसुद्धा केली जात नसल्यामुळे रस्त्यांवर कुठे उंचवटा तर कुठे खोलगट भाग अशी स्थिती झाली आहे. अशा रस्त्यांवरून वाहन चालवणे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे. वास्तविक रस्ता खोदताना तो जसा होता तसा करून देण्याची जबाबदारी संबंधित खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराची आहे; पण मोजक्याच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, ९० टक्के रस्ते बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले.
काही छोट्या रस्त्यांवर गटार लाइनच्या उंच चेंबरमुळे वाहन काढण्यासाठी जागाच शिल्लक नाही. अनेकांचे या प्रयत्नात अपघातही झाले आहेत. त्या रस्त्यांवरून जाणारे लोक दररोज संबंधित कंत्राटदाराला आणि नगर परिषदेला शिव्याशाप देत आहे, मात्र त्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही.
(बॉक्स)
पर्यवेक्षकीय यंत्रणाच गायब
या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे; पण या विभागाचा कोणीच अधिकारी या कामाकडे कधी ढुंकूनही पाहताना दिसला नाही. तरीही कंत्राटदाराला त्याच्या कामाचा मोबदला मात्र वेळोवेळी दिला जात आहे. विशेष नगर परिषदेची यंत्रणा तर आपल्याला काही सोयरसुतकच नाही अशा आविर्भावात राहात आहे. हे काम कसे होत आहे, नागरिकांना काय त्रास होत आहे, याची तमा ना नगर परिषद प्रशासनाला आहे, ना कोणत्याही पदाधिकाऱ्याला. आतापर्यंत कोणत्याच नगरसेवकाने या कामाबद्दल तोंडातून एक शब्दही काढलेला नाही.