लोकमत न्यूज नेटवर्क जोगीसाखरा : जिल्हा नियोजन समितीकडून वडसा वन विभागात आरमोरी वनपरिक्षेत्रातील वघाळा पक्षी उद्यानाचे बळकटीकरण करणे, या कामासाठी प्राप्त झालेला ६० लाख रुपयांचा निधी १०० टक्के खर्च झाल्याचा अहवाल जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाला असला, तरी नियोजनातील पक्षी उद्यानाचा निधी नेमका अधिकाऱ्यांनी कुठे खर्च केला, हे सध्या गुलदस्त्यात आहे. दरम्यान पक्षी संरक्षण व संगोपनाच्या कार्याला ब्रेक लागला आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्रातील वघाळा पक्षी संरक्षण उद्यानाचा विकास करून येणाऱ्या देशी-विदेशी पक्षांचे संरक्षण व संगोपन करून त्यांचे प्रजोत्पादनातून त्यांची संख्या वाढवून जैवविविधतेतून नैसर्गिक पर्यावरण निर्मितीला वाव मिळण्यासाठी आणि तसेच पक्षीप्रेमींचे ओढे वाढवून स्थानिक पक्षी संरक्षण समितीला आर्थिक पाठबळ मिळावे, या उदात्त हेतूने गडचिरोली जिल्हा नियोजन समिती ने सन २०२२-२३ मध्ये वाघाळा पक्षी उद्यानाचे बळकटीकरण करणे, या कामासाठी उपवनसंरक्षक वडसा यांना ६० लाख रुपये दिले, मात्र एवढा मोठा निधी आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला अप्राप्त असल्याने उद्यानाच्या विकासाला मुकावे लागले. एवढा मोठा निधी कुठे खर्च घातला, हे कळायला मार्ग नाही.
वडसा वन विभागातील आठ वनक्षेत्रांपैकी आरमोरी वनपरिक्षेत्रामध्ये वाघाळा हे एकमेव पक्षी उद्यान आहे. जंगलांना जाळीचे कुंपण झाले आहे. जनावरे चरायला जागा नाही, म्हणून शेतकरी नागरिकांनी पाळीव जनावरे कसायांच्या हातात दिले. एका जिवावर अवलंबून असलेले दुसरे जीव अनेक पक्षी, घार गिधाड, कावळा आदी पक्षांसह जैवविविधतेचे अस्तित्व संपुष्टात येत असताना, आता उद्यानातील पक्षी विकासावरचा मंजूर ६० लाख रुपये निधी १०० टक्के खर्च झाल्याचा अहवाल डिपीडिसीला पाठविण्यात आला आहे. आरमोरी रेंवनपरिक्षेत्र कार्यालयाला निधी पोहचलाच नाही, तर खर्च झाला कुठे?, पक्षी संरक्षण होणार कसे? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.
पक्षी जगले पाहिजेत म्हणून वाघाळा येथील नागरीकांनी चिंचेचे झाड जीवंत ठेवले नेहमीच्या बगळ्या सोबत विदेशी पक्षी येतात, बसतात. त्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा सामना करतात. अंगणात बसायची उजागिरी नाही, तरीही पक्षावर जीव लावतात आणि अधिकारी पक्षी संरक्षणाच्या जाहिरातींवर खर्च करून उद्यान विकासाचा निधी गोठवतात. शासनाची व जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
यासंदर्भात वडसाचे तत्कालीन उपवनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांना दोनदा संपर्क केला असता, त्यांनी मोबाइल कॉल स्विकारला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.
दरवाजे मोडले, शौचालय नादुरुस्त बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या तिरावर एक हेक्टर जागेमध्ये पक्षी उद्यान आहे. पर्यटकांसाठी दहा वर्षांपूर्वी येथे तीन बंगले तयार केले. त्यावरील अतिशय नित्कृष्ट दर्जाचे टिन पत्र्याचे छत उडाले आहे. दरवाजे मोडले असून, शौचालय नादुरुस्त आहे. या खोल्यांमध्ये मोडलेल्या खुर्चा, टेबल, एंगल भरून आहे. परिसरात गवत, कचरा व घाण पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.
सहा महिने राहतात पाहुणे पक्षीवन्यजीव पक्षी संरक्षण वघाळा येथे प्रामुख्याने करकोच जातींचे पक्षी येतात. त्यामध्ये ओपन बिल स्टार्क, पांढरा कुदळा/शंकर, व्हाइट इबीस, छोटा पान कावळा (लिटल कारमोरल), मध्यम बगळा (मिडीयम इग्रेट), गाय बगळा (कॅटेल इग्रेट), लहान बगळा (लिटल इग्रेट), लाल बगळा (चेस्टर बीटर्न), असे अनेक प्रकारचे पक्षी मे महिन्याच्या अखेर वघाळा येथे प्रवेश करतात आणि नोव्हेंबरअखेर इथून निघून जातात.