आॅईल इंजीनसाठी रॉकेल आणायचे कोठून?

By Admin | Updated: August 31, 2015 01:16 IST2015-08-31T01:16:17+5:302015-08-31T01:16:17+5:30

समाज कल्याण व कृषी विभागामार्फत दरवर्षी सबसिडीवर शेतकऱ्यांना आॅईल इंजीनचा पुरवठा केला जातो.

Where to bring kerosene? | आॅईल इंजीनसाठी रॉकेल आणायचे कोठून?

आॅईल इंजीनसाठी रॉकेल आणायचे कोठून?

शेतकऱ्यांचा सवाल : कृषी व समाज कल्याण विभाग पुरवितो इंजीन
गडचिरोली : समाज कल्याण व कृषी विभागामार्फत दरवर्षी सबसिडीवर शेतकऱ्यांना आॅईल इंजीनचा पुरवठा केला जातो. हे आॅईल इंजीन ग्रामीण भागात शेतकरी रॉकेलच्या माध्यमातून चालवितात. परंतु शेतकऱ्यांना यासाठी रॉकेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सरकार आॅईल इंजीन पुरविताना रॉकेलसाठीची व्यवस्था गावनिहाय का करून देत नाही, असा सवाल चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांनाही निवेदन पाठविले असून शेतकऱ्याच्या या प्रश्नाची सोडवणूक सरकारी यंत्रणेने करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या वनकायद्यामुळे अनेक सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत पडून आहे. चिचडोह बॅरेज वगळता नवीन सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला पावसाच्या भरवशावर शेती करावी लागते. काही शेतकरी गावालगतच्या नदी व तलावावरून पाण्याचा उपसा आॅईल इंजीनमार्फत करतात. त्यामुळे दरवर्षी कृषी व सामाजिक न्याय विभाग आॅईल इंजीन पुरवठ्यासाठी लाखो रूपयाच्या निधीची तरतूद करते. हे आॅईल इंजीन डिझेलवर चालवावे, अशी सरकारी यंत्रणांची भूमिका आहे. मात्र गावात सहजपणे डिझेल मिळत नाही. त्यामुळे केरोसीनचा वापर आर्थिकदृष्ट्याही परवडणारा असल्याने शेतकरी करतात. परंतु आता केरोसीन पुरवठ्यावरही बंधन आणले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केरोसीन मिळत नाही. त्यामुळे शेतीओलीताच्या कामावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शासनानेच आॅईल इंजीनधारक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र केरोसीनचा कोटा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Where to bring kerosene?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.