तोडसा, पेठा, गर्दैवाड्यात लालपरी पोहोचणार तरी कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 17:39 IST2024-07-12T17:38:19+5:302024-07-12T17:39:13+5:30
Gadchiroli : पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना जावे लागते तालुका मुख्यालयी

When will 'Lalpari' reach Todsa, Petha, Kariwada?
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी: नक्षल प्रभावित व दुर्गम तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. या तालुक्यात अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झालेली नाही. काही गावांमध्ये अद्यापही लालपरी पोहोचलेलीच नाही. पाच ते दहा किलोमीटर पायदळ वाट तुडवत नागरिकांना तालुका मुख्यालयी यावे लागते, असे चित्र आहे.
आकांक्षित जिल्हा म्हणून अहेरीत विकासकामे प्राधान्याने सुरु आहेत. मात्र, रस्ते, पुलाचा प्रश्न काही दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये कायम आहे. परिणामी तेथे अद्यापही राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरु केलेली नाही. अहेरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील मांड्रा, कासमपल्ली, एटापल्ली तालुक्यातील तोडसापेठा, गर्दैवाडा, बांडे, कोंदावाही, वेडमपल्ली, भामरागड तालुक्यातील विसामुंडी, लष्कर अशा अनेक गावांत आजही एसटी बस पोहोचली नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी येथील नागरिकांना खासगी वाहने किंवा पायदल जावे लागते
अहेरी आगारातून सुटणाऱ्या बसेस आजही अनेक दुर्गम, अतिदुर्गम भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे तेथे बसेस जाऊ शकत नाहीत, अशी भौगोलिक स्थिती आहे. रस्ते झाल्याशिवाय एसटी पोहोचणार नाही. त्यासाठी सरकारने धोरण बदलणे गरजेचे आहे.
- सुचित कोडेलवार, प्रवासी, अहेरी
हेरी उपविभागात अनेक गावांत आज रस्ते झाले आहेत. मात्र, अद्याप बससेवा सुरु करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आणि अहेरी गाठायला उशीर होतो. खासगी वाहनचालकांकडून आर्थिक लूटही होते. पावसाळ्याच्या दिवसांत रुग्ण, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. ही दैना लवकर संपवावी, अशी अपेक्षा आहे.
- बालाजी गावडे, प्रवासी
ज्या गावकऱ्यांना आपल्या गावात बसफेरी सुरु करायची असेल तिथे ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन मागणी करायला हवी. त्यानंतर सव्र्व्हे करून सुरक्षितता बघून बसफेरी सुरु केली जाते. नागरिकांनी मागणी केल्यास योग्य दखल घेतली जाईल.
- जितेंद्र राजवैद्य, वाहतूक निरीक्षक अहेरी आगार