दुसागुडातील विहिरींनी तळ गाठला
By Admin | Updated: April 29, 2016 01:39 IST2016-04-29T01:39:40+5:302016-04-29T01:39:40+5:30
तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.

दुसागुडातील विहिरींनी तळ गाठला
हातपंप नादुरूस्त : गावात पाण्याची टंचाई, पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष
एटापल्ली : तालुक्यातील दुसागुडा येथील तीन विहिरींच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली असून त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. तर तीन पैकी एक हातपंप पूर्णपणे बंद आहे. दोन हातपंपामधूनही पाहिजे त्या प्रमाणात पाणी निघत नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील हेडरी, परसलगोंदी, जांभिया, मवेली, कुदरी, रेकनार, कसानसूर, घोटसूर व दुसागुडा या गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यातील दुसागुडा हे जवळपास ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावांमध्ये तीन विहिरी आहेत. मात्र या तिन्ही विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्या कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. एक हातपंप बंद आहे. दोन हातपंपातून अत्यंत कमी पाणी येते. एक बकेट पाणी काढण्यासाठी १५ ते २० मिनीट हातपंप हलवावे लागते. हातपंप दुरूस्त करण्याबाबत पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती प्रशासनाचे सदर हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. विहिरीतील गाळ उपसल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. गाळ उपसणेही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. सोमा पदा, चंद्रा चंदू पोटावी, मागरू रैनू पोटावी, सादू नरोटे यांनी हातपंप दुरूस्तीची मागणी केली आहे.
दुर्गम भागातील गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
एटापल्ली तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम भागातील आहेत. या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. मात्र या गावांकडे प्रशासातील अधिकारी लक्ष देत नाही. गावातील नागरिकही याबाबतची तक्रार पंचायत समिती प्रशासनाकडे करीत नाही. त्यामुळे या गावांमध्ये असलेली पाणीटंचाई लक्षात येत नसली तरी पाणीटंचाई गंभीर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दुसागुडा येथील हातपंपावर सकाळपासूनच महिलांची गर्दी जमण्यास सुरुवात होते. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली.