बेतकाठीनजीकच्या जंगलात वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:19+5:302021-03-16T04:36:19+5:30
गडचिराेली : तालुक्यातील बेतकाठी रस्त्यालगत असलेल्या जंगलाला आग लागल्याने येथील वनसंपत्ती नष्ट हाेत आहे. जवळपास एक किमीच्या परिघातील ...

बेतकाठीनजीकच्या जंगलात वणवा
गडचिराेली : तालुक्यातील बेतकाठी रस्त्यालगत असलेल्या जंगलाला आग लागल्याने येथील वनसंपत्ती नष्ट हाेत आहे. जवळपास एक किमीच्या परिघातील छाेटे-माेठे झाडे जळून नष्ट झाले. वनाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे.
सुरेंद्रसिंह चंदेल हे रविवारी काेरची तालुक्याच्या दाैऱ्यावर हाेते. त्यांच्यासाेबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत जाेशी हाेते. बेतकाठी मार्गावरून जात असताना पहाडीवरील जंगलात आग लागल्याचे दिसून आले. वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांसाेबतच वनकर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे काेरची तालुक्यातील घनदाट जंगल दरवर्षीच्या उन्हाळ्यात आग लागून नष्ट हाेत आहे. आगीमुळे जंगल विरळ हाेत असल्याने सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. तर माेठे प्राणी आगीच्या भीतीने गावाकडे धाव घेत आहेत. बेतकाठी परिसरातील जंगल जाळले जात असून यात कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचा हात असू शकताे, अशी शक्यता चंदेल यांनी व्यक्त केली आहे.
बेतकाठी परिसरातील वणव्याच्या घटनेची चाैकशी करून दाेषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेंद्रसिंह चंदेल व भरत जाेशी यांनी केली आहे.