आलापल्ली शहरातील पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: October 30, 2016 01:21 IST2016-10-30T01:21:50+5:302016-10-30T01:21:50+5:30
दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवसात आलापल्ली येथील नळ पाणीपुरवठा बंद असल्याने काही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी

आलापल्ली शहरातील पाणीपुरवठा बंद
आलापल्ली : दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवसात आलापल्ली येथील नळ पाणीपुरवठा बंद असल्याने काही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी खरेदी करून आपली तहान भागवावी लागत आहे. तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
आलापल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न थकीत बिलामुळे निर्माण झाला असून २० हजार लोकसंख्या असलेल्या गावात आधीच ८० टक्के लोकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. परंतु अंदाजे २५ लाखांपेक्षा अधिक पाणीपुरवठा विभागाचे बिल थकीत असल्याने सदर संबंधित विभागाने आता आलापल्लीकरांना पाणीपुरवठा करण्यास चक्क नकार दिला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून आलापल्ली शहरात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
यापूर्वीसुद्धा आलापल्ली शहराचा पाणीपुरवठा अनेकदा खंडित झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून ग्रामपंचायत प्रशासनास थकीत बिलातील काही रक्कम अदा करायला लावले व पूर्ववत पाणीपुरवठा सुरू करण्यास बाध्य केले. अनेक वर्षांपासून येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून प्रभारी ग्रामसेवकाच्या भरवशावर ग्रा. पं. चा कारभार सुरू आहे. त्यामुळे पाणी प्रश्नांसह स्वच्छता व विकास कामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)