सिरोंचातील जलसाठे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:27 IST2019-05-29T00:25:04+5:302019-05-29T00:27:29+5:30
तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे.

सिरोंचातील जलसाठे कोरडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मानवासह पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सिरोंचा तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. जंगलातील वन्यजीव जंगलातील जलसाठ्यांवर तहान भागवतात. मात्र नैसर्गिक जलसाठे आटले आहेत. वन्यजीवांच्या पाण्याची सोय जंगलातच करण्यासाठी वनविभागाला कोट्यवधी रुपयांचा दरवर्षी निधी प्राप्त होते. मात्र वनविभाग सुद्धा सदर निधी जलसाठे निर्मितीवर खर्च करीत नाही. परस्पर या निधीची विल्हेवाट लावली जाते. जंगलातील कामांचे मूल्यमापन होत नाही. याचा गैरफायदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. जंगलातील जलसाठे आटल्याने वन्यजीव आता गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
दुर्गम भागातील नागरिक हातपंप व विहिरीच्या पाण्यावर तहान भागवतात. मात्र विहीर व हातपंपानी तळ गाठला असल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जवळपासच्या नदीचे पाणी आणून तहान भागविली जात आहे. हातपंप बंद असतानाही पंचायत समितीमध्ये कार्यरत यांत्रिकी विभाग याकडे लक्ष देत नाही. ग्रामपंचायती सुद्धा हातपंप बंद असल्याबाबत यांत्रिक विभागाकडे तक्रार करीत नसल्याचे दिसून येते.
गावातील एखाद्या हातपंपाला पाणी असल्यास त्या हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येते. पाणी मिळावे, यासाठी रात्रीच पाणी भरावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तक्रारी होत नसल्याने प्रशासनातील अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही.
तलावांचे खोलीकरण रखडले
सिरोंचा तालुक्यात धानाची शेती केली जाते. धानाला सिंचन देण्यासाठी प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. मात्र या तलावांमध्ये गाळ साचल्याने तलावांची पाणीसाठवण क्षमता कमी झाली आहे. तलावांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खोलीकरण झाले नसल्याने मार्च महिन्यातच तलाव कोरडे पडतात.
जंगलातील जलसाठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र हे तलाव सुद्धा कोरडे पडले असल्याने वन्यजीवांची मोठी पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी कित्येक वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.