सरकारी कार्यालयाच्या खोल्या झाल्या गुदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:18+5:302021-03-17T04:38:18+5:30
जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी ...

सरकारी कार्यालयाच्या खोल्या झाल्या गुदाम
जिल्हाभरातील नागरिक ग्रहण करत असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या अन्नापासून तर ते घेत असलेल्या औषधींच्या तपासणीपर्यंतची महत्त्वाची जबाबदारी या विभागाला सांभाळावी लागते. मात्र अनेक वर्षांपासून या विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. औषध प्रशासन विभाग तर पूर्णपणे वाऱ्यावरच सोडला आहे. त्यात एकही पूर्णवेळ अधिकारी नाही. अन्न विभागात नागपूर येथील सहायक आयुक्तांकडे येथील प्रभार आहे. एका अन्न निरीक्षकाला जिल्हाभरातील कामकाज सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरीही ते जिल्हाभरात फिरून तपासण्या करत मिळेल तिथे कारवाई करत असतात. मात्र विभागाने त्यांना पुरेशा सोयी आणि मनुष्यबळ दिल्यास त्यांच्या तपासण्यांचा वेग वाढू शकतो.
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ यादरम्यान जप्त सुगंधित तंबाखू
महिना किंमत
एप्रिल १,२४,७८५
जून ७९,२३०
जुलै ५५,४०८
ऑक्टोबर १,६२,९५०
डिसेंबर २,०५,३४५
जानेवारी २७,१८०
फेब्रुवारी ७९,३८०
मार्च १,०३,५४५
(बॉक्स)
वर्षभरात ३८.८३ लाखांचा तंबाखू साठा जप्त
- जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. साध्या तंबाखूसोबत सुगंधित तंबाखू टाकून बनविलेल्या खर्ऱ्याला सर्वाधिक मागणी आहे. सुगंधित तंबाखूचे डबे नागपूर, तेलंगणा, छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात आणणे सहज शक्य असल्यामुळे त्यांना रोखणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे हाच महत्त्वाचा सोपा मार्ग असतो.
- वर्षभरातील कारवायांवर नजर टाकल्यास अन्न निरीक्षक एस.पी. तोरेम यांनी २३ कारवायांमध्ये ३८ लाख ८३ हजारांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त केला आहे. यातील काही कारवाया साठेबाजी करणाऱ्यांवर तर काही विक्रेत्यांवरील आहेत. मनुष्यबळ मिळाल्यास सदर कारवाया वाढू शकतात.
(बॉक्स)
जप्त केलेला माल ठेवायचा कुठे?
- जप्त केलेला तंबाखू किंवा अन्य कोणताही माल ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नाही. दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाचे कार्यालय त्यांच्या नवीन इमारतीत स्थानांतरित झाल्यानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या चार खोल्यांच्या कार्यालयाला अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासनाकडून मागून आपले गुदाम बनविले.
- प्रकरण न्यायप्रविष्ठ असेपर्यंत जप्त माल सुरक्षित ठेवावा लागतो. प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तो माल नष्ट केला जातो. विशेष म्हणजे राज्यात प्रयोगशाळाही मर्यादित असल्यामुळे जप्त मालाचा रिपोर्ट येण्यासाठी २ ते ३ महिने लागतात.
जिल्ह्यात खर्ऱ्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूला आळा घालणे हे उद्दिष्ट.