जिल्ह्याला कापूस खरेदीदाराची प्रतीक्षा

By Admin | Updated: October 24, 2015 00:53 IST2015-10-24T00:47:51+5:302015-10-24T00:53:30+5:30

धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

Waiting for the cotton buyer in the district | जिल्ह्याला कापूस खरेदीदाराची प्रतीक्षा

जिल्ह्याला कापूस खरेदीदाराची प्रतीक्षा

शेतकरी संकटात : तेलंगणात जाते पांढरे सोने
गडचिरोली : धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र उत्पन्न होणारे कापूस तेलंगणा राज्यात मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. राज्य शासनाचे गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकाच्या अडचणीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. कापसाचे उत्पादन वाढूनही पणन महासंघाला येथे बाजारपेठ निर्माण करता आलेली नाही किंवा खासगी खरेदीदारही येथे येऊन कापूस खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान, सोयाबीन, तूर, कापूस, मका हे प्रमुख पिके घेतले जातात. जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असले तरी चामोर्शी, अहेरी, सिरोंचा या भागात सोयाबीनचाही पेरा वाढलेला आहे. त्याचबरोबर कापसाचाही पेरा प्रचंडप्रमाणात वाढलेला आहे. जिल्ह्यात मुलचेरा, सिरोंचा, चामोर्शी, अहेरी आदी तालुक्यात कापसाचे पीक घेतले जाते. २०१४-१५ मध्ये ७ हजार ७७३ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर २०१५-१६ मध्ये ८ हजार ५०० हेक्टर लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. २०१३-१४ मध्ये ८१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली व २ हजार २५ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले.
२००८ नंतर गडचिरोली जिल्ह्याच्या खरीप पीक पॅटर्नमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊन कापसाचा पेरा वाढला. उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढले. परंतु गडचिरोली जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या कापसाला स्थानिकस्तरावर बाजारपेठ उपलब्ध करण्यात शासनाला यश आले नाही. २००६-०७ मध्ये धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री असताना कापूस पणन महासंघाचे तात्पुरते खरेदी केंद्र सिरोंचा येथे सुरू करण्यात आले होते. एक वर्ष हे खरेदी केंद्र कसेबसे चालले. सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी, एटापल्ली आदी भागात कापसाचा पेरा आता प्रचंडप्रमाणात वाढला असल्यामुळे या भागातील उत्पादन होणारा कापूस थेट तेलंगणा राज्यात नेऊन विकावा लागतो. काही कापूस उत्पादक शेतकरी आपला माल वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजारपेठेत नेऊन विकतात. स्थानिकस्तरावर बाजार उपलब्ध नसल्याने मालाच्या वाहतुकीचा खर्चही कापूस उत्पादकालाच उचलावा लागतो. गेल्या दोन-तीन वर्षांत कापसाच्या भावातही प्रचंड प्रमाणात मंदी आली आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. उच्च प्रतीचा कापूस उत्पन्न होत असतानाही विदर्भात सीसीआय तसेच कापूस पणन महासंघ व राज्यातील काही खासगी व्यापारी खरेदी केंद्र उघडून कापसाची खरेदी करीत असतात. परंतु गडचिरोलीकडे या सर्वांचे दुर्लक्ष आहे. भाजप सरकारने येथे सीसीआरचे खरेदी केंद्र अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस जिल्ह्यात विकणे सुलभ होईल. यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र काही वर्षांपूर्वी सिरोंचा येथे सुरू करण्यात आले होते. मात्र त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते बंद झाले. यंदा कापूस पिकाची परिस्थिती बिकट आहे. जमिनीत ओलावा नसल्याने कापसाच्या पात्या गळत आहे. कापूस उत्पादक अडचणीत आला आहे.
- मुतन्नाजी दोंतुलवार, अहेरी

Web Title: Waiting for the cotton buyer in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.