तेंदूपत्ता संकलनाच्या प्रतिक्षेत
By Admin | Updated: May 11, 2014 23:38 IST2014-05-11T23:38:49+5:302014-05-11T23:38:49+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना वर्षभराची आर्थिक मिळकत मिळवून देणारा तेंदूपत्ता हंगाम कधी सुरू होतो

तेंदूपत्ता संकलनाच्या प्रतिक्षेत
मानापूर-देलनवाडी/अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना वर्षभराची आर्थिक मिळकत मिळवून देणारा तेंदूपत्ता हंगाम कधी सुरू होतो याची प्रतीक्षा जिल्ह्यातील वडसा व अहेरी वनविभागातील गावामधील नागरिकांना लागली आहे. आरमोरी तालुक्यातील नागरवाही, देलनवाडी परिसरातील मजूर अजुनही तेंदूपत्ता हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. या परिसरात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. अतिशय कमी शेतकर्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड शेतात केली. परंतु २ मे च्या मध्यरात्री आलेल्या वादळी पावसामुळे उन्हाळी धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी तेंदू हंगामाची वाट पाहत आहे. तेंदू हंगामातून शेतकरी खरीप पिकाचे आर्थिक बजेट मांडत असतो. तेंदूपत्त्याच्या मिळकतीतूनच शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खत व अन्य साहित्ये खरेदी करीत असतो. मानापूरलगत असलेल्या पिसेवडधा येथे तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात झाली आहे. परंतु नदी पलीकडे असलेल्या मानापूर येथे तेंदूपत्ता हंगामाला अजुनपर्यंत सुरूवात झाली नाही. मे महिन्यातील अर्धा कालावधी लोटला असतांनाही दरवर्षी होणारे रोजगार हमीचे कामे यंदा सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील मजुरांच्या हाताला काम न मिळाल्याने मजूर प्रशासनाप्रती उदासीन आहेत. अनेक शेतकरी मजुरीच्या प्रतीक्षेत असतांनाच बोदभरतीसाठी बाहेरील जिल्ह्यात जात आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेती हंगामाला अधिक जोर येत असल्याने सध्या बेरोजगार असलेल्या शेतकर्यांना तेंदूपत्ता हंगामाचे वेध लागले आहे. त्यामुळे मानापूर, देलनवाडी परिसरातील गावामध्ये तेंदूपत्ता हंगामाला त्वरित सुरूवात करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. तेंदू युनिट सुरू करण्याची युवक काँग्रेसची मागणी आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तिनही वनविभागातील तेंदूपत्ता युनिटची अजुनपर्यंत विक्री न झाल्याने तेंदूपत्ता हंगाम सुरू करण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे तिनही वनविभागात असलेल्या तेंदूपत्ता मजूर तेंदूपत्ता हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांना तेंदूपत्ता हंगामामुळे रोजगार मिळत असतो. दुर्गम भागात तेंदूपत्ता हंगाम पैसे मिळवून देणारा एकमेव हंगाम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या वनविभागात त्वरित युनिटची विक्री करून तेंदूपत्ता हंगामाला सुरूवात करावी, अशी मागणी अहेरी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बालाजी गावडे यांनी केली आहे. तेंदूपत्ता युनिटची विक्री न झाल्याने तेंदूपत्ता कटाईला सुरूवात अजुनही करण्यात आली नाही. त्यामुळे तेंदू हंगामाला अधिक विलंब होत आहे. जिल्ह्याच्या नागरिकांचे अर्थकारण तेंदूहंगामावरच अवलंबून आहे. तेंदू हंगाम उशिरा सुरू झाल्यास शेतीचे कामे व तेंदूपत्ता संकलन एकत्रितच येते. त्यामुळे मजुरांना अडचण होते. त्यामुळे हंगाम सुरू होणे गरजेचे आहे. (लोकमत वृत्त सेवा)