मतदानाच्या वेळी मतदारांनी चोखंदळ असावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 01:59 IST2017-01-26T01:56:01+5:302017-01-26T01:59:14+5:30
राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. घर बांधतांना आपण प्रत्येक वस्तूची गुणवत्ता तपासतो,

मतदानाच्या वेळी मतदारांनी चोखंदळ असावे!
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
गडचिरोली : राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. घर बांधतांना आपण प्रत्येक वस्तूची गुणवत्ता तपासतो, त्याचप्रमाणे मतदान करतानाही मतदारांनी चोखंदळ असावे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले.
येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात मतदानाचा दिनाचा कार्यक्रम बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, तहसीलदार संतोष खांडरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदारांमध्ये जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता राज्य निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यंदाचा सातवा मतदार दिन गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयटीआयच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने आदिवासी नृत्य सादर केले. तसेच पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती केली. लोकशाहीच्या उभारणीत मतदारांनी आपले योगदान द्यावे व या कामात नवमतदारांनी पुढाकार घ्यावा, भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत आवर्जुन मतदान करणे गरजेचे आहे. याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मतदार नोंदणी व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदान ओळखपत्राचे वाटप जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही लोकशाहीबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक तसेच युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)