आंध्रप्रदेश - ओडिशा सीमेवर जहाल नक्षल नेता जगन, रमेश ठार

By संजय तिपाले | Updated: May 8, 2025 15:18 IST2025-05-08T15:18:27+5:302025-05-08T15:18:56+5:30

जोरदार चकमक : दोघांवर होते २५ लाखांचे बक्षीस

Violent Naxal leaders Jagan, Ramesh killed on Andhra-Odisha border | आंध्रप्रदेश - ओडिशा सीमेवर जहाल नक्षल नेता जगन, रमेश ठार

Violent Naxal leaders Jagan, Ramesh killed on Andhra-Odisha border

संजय तिपाले
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरुध्द करेगुट्टा येथे २२ माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत दोन जहाल माओवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. आंध्रप्रदेश- ओडिशा सीमेचा विशेष झोनल कमिटी सदस्य काकुरी पंडान्ना उर्फ जगन (६०) व केंद्रीय समिती सदस्य रमेश उर्फ वागा पोडियामी (५१) यांचा मृतांत समावेश आहे. 

करेगुट्टा येथे ७ मे रोजी जवान व माओवाद्यांत चकमक झाली. या धूमश्चक्रमीत २ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. याचवेळी तिकडे आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील अल्लूरी सीतारामराजू  जिल्ह्यातील गुडेम कोठाविधी तालुक्याच्या दुमाकोंडा वनक्षेत्रात जवान व माओवाद्यांत जोरदार चकमक उडाली. यात २० लाख रुपयांच बक्षीस असलेला जगन व पाच लाखांचे बक्षीस असलेला रमेश या दोन जहान नक्षल नेत्यांना जवानांनी बंदुकीचा निशाणा ठरवले. घटनास्थळावरुन एके- ४७ सारखी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. या परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.

 

चलपतीनंतर जगनवर होती जबाबदारी 
जानेवारी २०२५ मध्ये जहाल माओवादी नेता चलपती उर्फ रामचंद्र रेड्डी उर्फ जयराम याचा चकमकीत खात्मा करण्यात आला होता. मूळचा  आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चलपतीच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडसह ओडिशात अनेक नक्षल मोहिमा राबविण्यात आल्या होत्या.  त्याच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी जगनच्या खांद्यावर आली होती. जगनसह अरुणा, गजरला रवी व इतर नेत्यांसह १५ हून अधिक माओवाद्यांचा एक गट बऱ्याच काळापासून आंध्रप्रदेश- ओडिशा सीमावर्ती भागातील जंगलात  फिरत होता. ही माहिती मिळाल्यावरुन जवानांनी मोहीम राबवली, यात जगन व रमेश या दोघांना ठार करण्यात यश आले. 

तेलंगणात माओवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील ५ हजार फूट उंच करेगुट्टा पहाडीवर २१ एप्रिलपासून सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये ७ मे रोजी २२ माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. दरम्यान, नक्षलविरोधी अभियानादरम्यान तेलंगणात माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात तेलंगणाचे तीन जवान शहीद झाले तर एक जवान जखमी आहे. ८ मे रोजी तेलंगणातील वाजेडू परिसरातील अभियानादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, त्यामुळे माओवादी पळून गेले. तेथे नक्षलविरोधी अभियान गतिमान केले असून ग्रेहाऊंडस पथके तैनात केली आहेत.
 

Web Title: Violent Naxal leaders Jagan, Ramesh killed on Andhra-Odisha border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.