गावातील नागरिकांनी वडिलोपार्जित बंदुका केल्या पोलिसांच्या स्वाधीन ; माओवादी घ्यायचे फायदा
By दिगांबर जवादे | Updated: October 24, 2025 18:21 IST2025-10-24T18:19:03+5:302025-10-24T18:21:10+5:30
Gadchiroli : शांततेसाठी एक पाऊल, एसपींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

Villagers surrender ancestral guns to police; Maoists take advantage
गडचिरोली : जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलाेत्पल यांच्या आवाहनानंतर गुरुवारी एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी पाेलिस स्टेशन हद्दीतील हिंदुर, नैनवाडी, तोडगट्टा या दुर्गम भागातील नागरिकांनी २६ भरमार बंदुका व ११ बंदुकीची बॅरल पाेलिसांच्या स्वाधीन केल्या. जिल्ह्यातील विस्तीर्ण जंगलक्षेत्रामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिक पारंपारिक शेतीसोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत.
वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठीही अनेकांनी वडीलोपार्जित बंदुका बाळगलेल्या आहेत. परंतु, माओवादी या परिस्थितीचा फायदा घेऊन नागरिकांना त्यांच्या चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करीत असतात.सध्या माओवाद्यांचे प्रमाण घटले असून, मागील पाच वर्षांत एकही तरुण माओवादी चळवळीत भरती झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी नागरिकांना स्वत: जवळील बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी पाेलिस स्टेशन हद्दीतील हिंदुर, नैनवाडी, तोडगट्टा या दुर्गम भागातील नागरिकांनी २६ भरमार बंदुका व ११ बंदुकीची बॅरल स्वाधीन पाेलिसांच्या केल्या.
ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर, हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे आणि सीआरपीएफचे अधिकारी-अंमलदार यांनी पार पाडली.
चार वर्षात ३६५ बंदुका केल्या स्वाधीन
सन २०२२ ते २५ या चार वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी एकूण ३६५ भरमार बंदुका पोलीस दलाच्या स्वाधीन केल्या आहेत. या कामगिरीतून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ होत असून, गडचिरोली माओवादमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.