ताडगाव प्राथमिक आरोग्य पथकाअंतर्गत ताडगाव येथील रुपी वारलू मडावी या गरोदर महिलेची अचानक आपल्या राहत्या घरीच सुखरूप प्रसूती झाल्याची माहिती मिळताच ताडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागार्जुन मानकर, आरोग्य सेविका संगीता वाढणकर, आशा वर्कर बावणे, आदी रुग्णवाहिकेसह प्रसूत महिलेच्या घरी पोहोचले. माता व नवजात बाळावर तत्काळ प्राथमिक उपचार केले. परंतु, नवजात बाळ हे कमी वजनाचे असल्याने प्रसूत माता व नवजात शिशूला वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे आवश्यक असल्याने डॉ. मानकर यांनी पुढील उपचारासाठी सदर माता व बालकास ग्रामीण रुग्णालयात भामरागड येथे पाठविणे आवश्यक असल्याचे सांगितले. परंतु, वैद्यकीय पथकाने वारंवार विनंती करूनही प्रसूत माता व कुटुंबातील नातेवाइकांनी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात येण्यास नकार दिला. संबंधित माहिती कळताच ताडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ पिंगळे, अहिरे, सयाम यांनी प्रसूत महिलेच्या घरी भेट दिली. महिला अंमलदार मीना गावडे, गोपिका सडमेक, शालिनी तोडे यांच्यामार्फत स्थानिक भाषेत वैद्यकीय उपचार घेणे हे किती आवश्यक आहे, असे प्रसूत माता व नातेवाइकांना समजावून सांगितले. उपचारासाठी आर्थिक मदत पाहिजे असेल तर आम्हाला कळवा, मदत करायला तयार आहे, असे पोलीस प्रशासनाने समजावून सांगितल्यानंतर प्रसूत माता व नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी रवाना होण्यास सहमती दर्शवली. आरोग्य पथकाच्या देखरेखीखाली या महिलेस तत्काळ भामरागड हेमलकसा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रसूत माता व नवजात बालक सध्या सुखरूप असून, लोकबिरादरी दवाखान्याचे डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे यांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.
बाॅक्स
कपडे उपलब्ध
पोलीस विभागातर्फे प्रसूत मातेला रुग्णालयात जाताना आवश्यक कपडे उपलब्ध करून दिले. आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर घरी येऊन मार्गदर्शन व मदत केल्याबद्दल मडावी कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.