बळीराजाला आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:30+5:30
नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे. यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही.

बळीराजाला आधाराची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : यंदाच्या धान, सोयाबीन, कापसाच्या व अन्य पिकांच्या पेरणीच्या वेळी पाऊस गायब झालेल्या पावसाने नंतर जोरदार हजेरी लावल्याने अतिवृष्टी झाली. त्यातही कसेबसे पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले. परिणामी यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून आता तत्काळ मदतीची गरज आहे. नुकसानभरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांना एकरी २० हजारांची मदत ताबडतोब करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवनिर्वाचित आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनाकडे केली आहे.
यंदा परतीच्या पावसाने शेतकरी पार खचून गेला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे पर्यायी साधन नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी धर्मरावबाबांनी केली आहे.
बहुतांश ठिकाणी हलक्या प्रतीच्या धानाची कापणी करून त्याच ठिकाणी सुकविण्यासाठी ठेवले असताना अचानक पाऊस झाला. त्यामुळे धानाला नवीन अंकुर (कोंब) फुटत असून जड प्रतीचे धान वादळ वाऱ्याने खाली कोसळून पडले आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी आणि अन्य पिकांची हीच अवस्था झाली आहे. हाती आलेले पीक परतीच्या पावसामुळे हातातून जात असल्याने ही मदत तातडीने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कामीही लागली आहे. पण कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी यातून सुटणार नाही आणि त्याला भरपाई मिळेल याची दक्षताही प्रशासनाने घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.