एका डॉक्टरवर चालते पशुचिकित्सालयाचे काम

By Admin | Updated: September 6, 2014 23:47 IST2014-09-06T23:47:46+5:302014-09-06T23:47:46+5:30

पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने ग्रामीण भागासह शहरी भागातीलही पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज झालेले असतात. परंतु चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात

Veterinarian work on a doctor | एका डॉक्टरवर चालते पशुचिकित्सालयाचे काम

एका डॉक्टरवर चालते पशुचिकित्सालयाचे काम

लोमेश बुरांडे - चामोर्शी
पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने ग्रामीण भागासह शहरी भागातीलही पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज झालेले असतात. परंतु चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. पशुचिकित्सालयाचा कारभार केवळ एका डॉक्टरवर असल्याने येथे उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या अनेक जनावरांवर वेळेवर उपचार करण्यास अडचण जात आहे. पशुचिकित्सालयातील प्रणोपचारक व परिचाराचे पद रिक्त असल्याने जनावरांवर वेळीच उपचार होऊ शकत नाही.
चामोर्शी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा आहे. जिल्हा परिषदेकडून २५ मे २००४ पासून राज्य शासनाच्या अखत्यारित या दवाखान्याचा कारभार आहे. या ठिकाणी नवीन तालुका पशुसंवर्धन, लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे बांधकाम अंदाजे १ कोटी २० लाखांचा निधी खर्च करून होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर जुन्या इमारतीत सुरू असलेला पशुवैद्यकीय दवाखाना हा किसान विश्रामगृहात स्थानांतरीत होण्याच्याही चर्चा आहेत. परंतु सध्य:स्थितीत या पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट आहे. प्रणोपचारक व परिचरचे प्रत्येकी १ पद रिक्त असल्याने दररोज २० ते २५ जनावरांची तपासणी होत असलेल्या दवाखान्यात पशुपालकांच्या जनावरांना उपचार मिळण्यास अडचण जात आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे यांच्यावर संपूर्ण दवाखान्याचा कार्यभार आहे. दवाखान्यातील सर्व कामे डॉ. खाडे पार पाडत आहेत. येथील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्र. म. बुरले यांच्याकडे गडचिरोली येथील प्रभारी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धनाचा प्रभार असल्याने चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. परिणामी ग्रामीण भागातून उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांवर वेळीच उपचार मिळत नाही. त्यामुळे रिक्त असलेले पद त्वरित भरावे, अशी मागणी दिवाकर झलके, गितेश्वर लटारे, सुनिल कुनघाडकर, ऋषीदेव कुकडे व पशुपालकांनी केली आहे.

Web Title: Veterinarian work on a doctor