अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी करा
By Admin | Updated: June 24, 2016 02:02 IST2016-06-24T02:02:49+5:302016-06-24T02:02:49+5:30
२०१५- १६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यानुसार

अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी करा
शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी
गडचिरोली : २०१५- १६ च्या आॅनलाईन संच मान्यतेनुसार अतिरिक्त व रिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यानुसार शाळा व संस्थेतून ठरणाऱ्या शिक्षकांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही शाळांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्त्वानुसार शिक्षकांना अतिरिक्त ठरविणे अपेक्षित होते. मात्र काही संस्थांमध्ये आपल्या मर्जीतील शिक्षकांना अभय देऊन अनेक शिक्षकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी काटेकोर करावी, अशी मागणी विमाशिच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील नियम १२ नुसार कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी तयार करून त्यातील कनिष्ठतम कायम कर्मचारी अतिरिक्त ठरविण्याचे शासन निर्णयात नमुद असतानाही या नियमाला बगल दिली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी विमाशिच्या वतीने शिक्षणाधिकारी (मा.) नानाजी आत्राम यांच्याकडे करण्यात आली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, अजय लोंढे, शेमदेव चाफले, अनिल गांगरेड्डीवार, यशवंत रायपुरे, महेंद्र वाकडे, सुरेंद्र मामीडवार, यादव बानबले, संजय खांडरे, नरेंद्र भोयर, संजय घोटेकर, संजय दौरेवार, रवींद्र बांबोळे, टेकाम, निमजे, टिकले, उराडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)