मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगावातून कसाईसाठी कत्तलखान्याकडे जनावरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना मुरूमगाव पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार मुरूमगाव परिसरातून कत्तलीसाठी जनावरे वाहनात कोंबून नेल्या जात असल्याची गुप्त माहिती मुरूमगाव पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे मुरूमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी स्वप्नील नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन गलवे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी मुरूमगाव मार्गावर नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करीत होते. याचवेळी एमएच-४० वाय-८५१ क्रमांकाचे मिनी मेटॅडोअर वाहन जनावरांना घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले. तसेच या वाहनातील आरोपी एजाज खान मज्जीद खान पठाण रा. कमलानगर (देसाईगंज), नवशाद कुरेशी व शेरू उर्फ अब्दुल रहेमान कुरेशी रा. कमलानगर या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिनही आरोपींवर पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देण्याच्या प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुरूमगाव पोलिसांनी या तिनही आरोपींना धानोराच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कत्तलखान्याकडे कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांना वाचविले. (वार्ताहर)
जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त
By admin | Updated: August 24, 2014 23:29 IST