वैरागड- कुरंडीमाल रस्त्याचे काम होत आहे थातूरमातूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:37 IST2024-12-09T13:35:49+5:302024-12-09T13:37:35+5:30
प्रशासन सूस्त : गिट्टीमुळे वाढले अपघाताचे प्रमाण

Vairagad-Kurandimal road is not of good quality
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वैरागड, डोंगरतमासी, कुरंडीमाल या रस्त्याचे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पसरविलेल्या गिट्टीमुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
तालुक्यातील वैरागड, डोंगरतमासी, कुरंडीमाल हा दोन किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक निधीतून मंजूर करण्यात आला. सदर कामाचे कार्यारंभ आदेश कंत्राटदारांना देण्यात आले. मार्च महिन्यात सदर कंत्राटदाराने गिट्टीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला टाकले. मात्र, गिट्टीचे ढिगारे तसेच ठेवल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासही सहन करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. शिवाय रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सदर कंत्राटदाराने गिट्टीचे काही ढिगारे अर्धा किलोमीटरपर्यंत पसरविले आणि बाकीचा रस्ता जसा तसा ठेवला आहे इतकेच नव्हे तर ठोकळ गिट्टीऐवजी बारीक व कमी जाडीची गिट्टीही रस्त्यावर पसरविण्यात आली. याबाबत काही गावकऱ्यांनी तोंडी स्वरूपात वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने शाखा अभियंता ढवळे यांनी सदर रस्त्याच्या कामाची चौकशी केली होती. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याबाबत काहीच कारवाई करण्यात आली नाही.
कंत्राटदार, अभियंत्यावर कारवाईची मागणी
- निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप आहे. कंत्राटदार व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
- जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर रस्ता व विविध विकास कामांच्या पर्यवेक्षणासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र वैरागड भागातील अनेक ठिकाणच्या कामांमध्ये गुणवत्ता दिसून येत नसल्याने संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.