वैरागड किल्ल्याला मूळ स्वरूप प्राप्त होणार
By Admin | Updated: November 26, 2014 23:06 IST2014-11-26T23:06:46+5:302014-11-26T23:06:46+5:30
इसवी सन १२ व्या शतकात चंद्रपूरचे गोंडराजे बाबाजी बल्लाळशाह यांनी प्रदेशाच्या रक्षणार्थ बांधलेला किल्ला ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत असून शेवटच्या घटका मोजत आहे.

वैरागड किल्ल्याला मूळ स्वरूप प्राप्त होणार
वैरागड : इसवी सन १२ व्या शतकात चंद्रपूरचे गोंडराजे बाबाजी बल्लाळशाह यांनी प्रदेशाच्या रक्षणार्थ बांधलेला किल्ला ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत असून शेवटच्या घटका मोजत आहे. पौराणिक किल्ल्याचे अस्तित्व कायम राहावे, या हेतुने पुरातत्व विभागाने वैरागडच्या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे. मूूळ स्वरूप प्राप्त करण्यासाठी वैरागड येथे कारागिर दाखल होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाकडून मिळाली आहे.
बदलत्या काळात वैरागडच्या ऐतिहासिक किल्ल्याकडे पुरातत्व विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. यामुळे या किल्ल्याच्या चारही बाजुने बरीच पडझड झाली. किल्ल्याच्या तटावर बुरूजांना झाडाझुडुपांनी वेढले आहे. या ऐतिहासिक ठेव्याची शासनाकडून जपणूक व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सामाजिक संघटनांसह नागरिकांकडून होत होती. अखेर प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर पुरातत्व विभागाने वैरागड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला मंजुरी दिली. गेल्या महिनाभरापासून किल्ल्याच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. वैरागड येथे हिऱ्याची खाण होती. या खाणीच्या रक्षनार्थ बल्लाळशाह राजाने गावालगत उत्तरेला किल्ला बांधला. सैन्याला शत्रूपासून राज्याचे रक्षण करता यावे, या उद्देशाने बल्लाळशाह राजाने वैरागडचा किल्ला त्या काळात बांधला. या किल्ल्यात १८ पुरूष असून विविध प्रकारच्या सहा विहिरी तसेच मुख्य प्रवेशद्वार आहे. मागील दरवाजा व किल्ल्याची रेखीव बांधणी पाहिल्यानंतर त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची प्रचिती येते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथील हिऱ्याच्या खाणीचे उत्खनन झाले व बल्लाळशाह राजाचे वैरागड येथील वास्तव्य संपल्यानंतर या किल्ल्याच्या अधोगतीला सुरूवात झाली. शेकडो वर्षांपासून या किल्ल्यावर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम होत होता. मागील ८-१० वर्षांपासून वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेऊन दोन वर्षांपूर्वी या किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली होती. मात्र कायमस्वरूपी सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नव्हती. या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला पुरातत्व विभागाने मंजुरी दिल्यामुळे गेल्या महिनाभरापासून गतीने काम सुरू आहेत. या कामात १२ मजूर लागले असून आणखी काही मजूर किल्ल्याला मूळ स्वरूप देण्यासाठी वैरागडात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)