आदिवासीबहुल हिंदेवाडात ४५ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:41 IST2021-05-25T04:41:06+5:302021-05-25T04:41:06+5:30
तालुक्यात प्रशासनाच्या वतीने गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात शिबिर घेऊन लसीकरण करण्यात येत आहे. मात्र ...

आदिवासीबहुल हिंदेवाडात ४५ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण
तालुक्यात प्रशासनाच्या वतीने गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावात शिबिर घेऊन लसीकरण करण्यात येत आहे. मात्र नागरिक लस घेण्यास तयार हाेत नाही. हिंदेवाडा गावातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी तहसीलदार अनमोल कांबळे, गटविकास अधिकारी राहुल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात ग्रामसेवक अविनाश गोरे व तलाठी संजय गावडे यांनी लसीकरणाच्या पाच दिवसांपूर्वी पासून गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. तेंदूपत्ता हंगाम असल्याने लसीकरणाची वेळ लोकांकडून सकाळी सात वाजता ठरविण्यात आली. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता गावात आराेग्य पथक पाेहाेचले.
लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर गावात असूनसुद्धा बरेच लोक लसीकरणास येत नव्हते. त्यांच्या मनात भीती होती पण लस घेण्याची इच्छाही होती. ही बाब ग्रामसेवक अविनाश गोरे यांनी ओळखून ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तिम्मा, अरुणा वेलादी, नीलाबाई तिमा, सरपंच रोशन वडे,गावाचे प्रतिष्ठित नागरिक बाजीराव वेलदी, सहिचद कोडापे, एम.ओ.महिंद्रा, आरोग्य सेवक पूनावार,तलाठी संजय गावडे यांच्या मदतीने सदर लोकांच्या घरी जाऊन त्यांना समजावून लसीकरण करिता तयार करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने गावात १०० टक्के लसीकरण करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायत सरपंच रोशन वडे, निलाबाई तीमा, ग्रामसेवक अविनाश गोरे, एनम पिली, गव्हारे, आशा वर्कर छाया सडमेक, सविता नरताम, सपना पुंगाटी, दीपाली गव्हारे, अंगणवाडी सेविका विमल नेताम, शेवंता कुमरे,पेसा मोबीलायझर, जिजा सडमेक, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कळंगा, शिक्षक एस.एम. महाका यांनीही मदत केली.
प्रत्येक घरी जाऊन केली जागृती
ज्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली त्यांचे बॅनर बनवून गावात लावण्यात आले. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने ४५ वर्षांवरील व्यक्तीच्या याद्या बनवून घरोघरी भेटी दिल्या. लसीकरणाचे महत्व पटवून दिले. याकरिता गावातील शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, पुजारी यांची मदत घेतली. लसीकरणाच्या एक दिवसापूर्वी मुख्याधिकारी डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केेले. लोकांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले.