रिक्त पदांनी पशुवैद्यकीय सेवा झाली पांगळी
By Admin | Updated: July 2, 2017 02:01 IST2017-07-02T02:01:21+5:302017-07-02T02:01:21+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने या व्यवसायासाठी पशुधनाची आवश्यकता भासते.

रिक्त पदांनी पशुवैद्यकीय सेवा झाली पांगळी
पशुपालक हैराण : पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल ५८ पदे रिक्त, पावसाळ्यात समस्या उद्भवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने या व्यवसायासाठी पशुधनाची आवश्यकता भासते. शिवाय शेती व्यवसायासोबतच पशुपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचीही संख्या मोठी आहे. पशुधनाची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत असणाऱ्या अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा पांगळी झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील पशुपालक प्रचंड हैराण झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात श्रेणी १ चे ९२, श्रेणी २ चे ३९ व ७ फिरते पशुचिकित्सालय असे एकूण १३८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. हे सर्व दवाखाने मिळून जिल्हाभरात पशुधन विकास अधिकाऱ्यांची एकूण १०८ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ ५० पदे भरण्यात आली असून पशुधन विकास अधिकाऱ्यांची तब्बल ५८ पदे रिक्त आहेत.
पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसोबत सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुपट्टीबंधक, पशुधन पर्यवेक्षक, परिचर व वाहनचालक आदी पदे कार्यरत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या संवर्गातील बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा प्रचंड अस्थिपंजर झाली आहे. तालुकास्थळासह मोठ्या गावात तसेच ग्रामीण व दुर्गम भागात ही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पाळीव जनावरांवर वेळीच उपचार झाल्यास पशुधन सुरक्षित राहू शकते, आता खरीप हंगामाला सुरुवात झाली असून अनेक गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय पशुंना होणाऱ्या विविध रोगाला कारणीभूत घटकही पावसाळ्यात अधिक कारणीभूत होत असतात. त्यामुळे पाळीव जनावरांची पावसाळ्यात संबंधित पशुपालक व पशुवैद्यकीय विभागाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मात्र तसे न झाल्यास जिल्ह्यातील पशुधन धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. पशुधनावरच शेतकऱ्यांची संपूर्ण मद्दार असते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी व पशुपालक आपल्या पाळीव प्राण्यांची चांगल्या प्रकारे खबरदारी घेत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग खिळखिळा झाल्याने पावसाळ्यात पशुंना होणाऱ्या विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.