वनविभागात पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:33+5:302021-05-27T04:38:33+5:30
आलापल्ली : जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे ...

वनविभागात पदे रिक्त
आलापल्ली : जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
डास व कीटक वाढले
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाले कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व किटकांची उत्पत्ती होत असून आरोग्य धोक्यात आले आहे. फवारणी करून डास व किटकांचा बंदोबस्त करावा.
गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात.
अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात
जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावांतील पांदण अतिक्रमणात आहेत.
गाेलाकर्जीत कव्हरेज गुल
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे. त्यामुळे समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे धोका
भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगरपंचायतीकडे केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.
कव्हरेजची समस्या
घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागातील अनेक मोबाइलधारक इंटरनेटचा वापर करतात. परंतु, कव्हरेज विस्कळीत होत असल्याने ऑनलाइन कामे रखडत आहेत. सातत्याने मागणी करूनही सुधारणा करण्यात आली नाही.
सिंचन क्षेत्रात झाली घट
रांगी : परिसरातील मोहली, महावाडा, निमनवाडा गावांतील अनेक मामा तलावाच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी
देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युतप्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाहनांवर कारवाई नाही
भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.
गतिराेधक बांधा
आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधणे आवश्यक आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने सदर चौकात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे गतिराेधक बांधावे.
मोहझरीत रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
लघुसिंचन इमारत जीर्ण
अहेरी : येथील उपविभागीय लघुसिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय, शहरात अनेक शासकीय कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविली जात आहेत. त्यामुळे अडचण येत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढण्याची गरज आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
रस्ता बांधकाम करा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने, नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असते.
वाहनांना आवर घाला
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावेत.
वडधात वीजसमस्या
आरमोरी : वडधा व देवीपूर परिसरातील वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने कृषीपंपामार्फत भाजीपाला पिकाला पाणी देण्यास अडचण येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने येथे नियमित वीजपुरवठा करावा.