उसेंडींच्या वक्तव्याने आदिवासी समाजात तेढ

By Admin | Updated: April 25, 2017 00:40 IST2017-04-25T00:40:20+5:302017-04-25T00:40:20+5:30

गोवारी जमात ही आदिवासी जमात असून या जमातीच्या सर्वच चालीरिती आदिवासी जमातींशी मिळत्या-जुळत्या आहेत.

Usendi's statement tarnishes in tribal society | उसेंडींच्या वक्तव्याने आदिवासी समाजात तेढ

उसेंडींच्या वक्तव्याने आदिवासी समाजात तेढ

पत्रकार परिषद : आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
गडचिरोली : गोवारी जमात ही आदिवासी जमात असून या जमातीच्या सर्वच चालीरिती आदिवासी जमातींशी मिळत्या-जुळत्या आहेत. मात्र चुकीने १९५६ रोजी गोवारी ऐवजी गोंडगोवारी असा उल्लेख संसदेच्या राजपत्रात करण्यात आला. तेव्हापासून गोवारी जमात शासनासोबत लढा देत आहे. असे असताना माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी मोहटोला येथील समाज प्रबोधन मेळाव्यात गोवारींच्या रूढी परंपरा आदिवासींसोबत जुळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला.
मागील विधानसभा निवडणुकीत गोवारी समाजातील बहुतांश नागरिकांनी डॉ. नामदेव उसेंडी यांना मतदान केले नव्हते. याचा वचपा काढण्यासाठी ते नेहमीच गोवारी समाजाच्या विरोधात भाष्य करतात. केंद्राच्या राजपत्रात दर्शविल्याप्रमाणे गोंडगोवारी ही जातच अस्तित्त्वात नाही. राजपत्रात चुकीने गोंडगोवारी अशी नोंद झाली आहे. ज्या नागरिकांना गोंडगोवारी जमातीचे जात वैैधता प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यांच्याही पी-१ प्रमाणपत्रांवर गोवारी असाच उल्लेख करण्यात आला आहे. मध्यप्रदेश सरकार गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ देत आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने गोवारी समाजाला एसबीसी प्रवर्गात टाकून त्यांच्यावर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरोधात मागील ५० वर्षांपासून गोवारी समाज लढा देत आहे. गोवारी ही आदिवासी जमात असल्याचे पुरावे १९३१ च्या जनगणनेपासून आढळून येतात. त्यामुळे गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक क्रिष्णा सर्पा, रूपेश चामलाटे, दामोधर नेवारे, धुकालू वाघाडे, नत्थूराम सर्पा, जोहरू गुरूभेलिया, अरूण नायक, धनराज दुधकुंवर, प्रकाश ठाकरे, बाबा नाथेश्वर, जगन राऊत, दुधराम ठाकरे, राजीराम राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Usendi's statement tarnishes in tribal society