जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धान कापणीसाठी यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 00:58 IST2016-10-30T00:58:11+5:302016-10-30T00:58:11+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या शहरीभागासह आता ग्रामीण भागातही शेतीपयोगी कामे करण्यासाठी ट्रॅक्टर, कोनोव्हीडर यांच्यासह विविध यंत्राचा वापर केला जात आहे.

Use of machinery for paddy harvest in the rural areas of the district | जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धान कापणीसाठी यंत्राचा वापर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धान कापणीसाठी यंत्राचा वापर

जनजागृतीचा परिणाम : कमी वेळात उरकली जाताहेत कामे
कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्याच्या शहरीभागासह आता ग्रामीण भागातही शेतीपयोगी कामे करण्यासाठी ट्रॅक्टर, कोनोव्हीडर यांच्यासह विविध यंत्राचा वापर केला जात आहे. सध्या हलक्या व मध्यम प्रतीच्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. धान कापणीच्या कामासाठीही यंत्राचा वापर कुरखेडा तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामात दोन लाखांवर हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली. हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीसह रोवणी व शेती मशागतीची इतर कामे आटोपून घेतली. निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतजमिनीत हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाची रोवणी करण्यात आली तर बारमाही सिंचन सुविधा असलेल्या शेत जमिनीत अनेक शेतकऱ्यांनी यंदा विविध प्रकारच्या नवीन जातीच्या जड प्रतीच्या धानपिकाची रोवणी केली. आता हलके व मध्यम प्रतीचे धानपीक कापणीयोग्य झाले आहे. तर जड प्रतीचे धान गर्भावस्थेत आहे.
शेतीपयोगी कामात गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुरूष व महिला मजुरांची टंचाई भासत आहे. शिवाय मजुरांच्या मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे अनेक सदन शेतकरी ट्रॅक्टर, थ्रेशर, कोनोव्हीडर, हार्वेस्टर व इतर यंत्र शेतीपयोगी कामासाठी खरेदी करीत आहेत. या यंत्रामुळे कमी वेळात व कमी खर्चात शेतीची विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता थ्रेशर मशीन पोहोचल्याने पारंपरिक मळणीचे काम कमी झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use of machinery for paddy harvest in the rural areas of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.