बनावट बिलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:54+5:302021-03-18T04:36:54+5:30

अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा ई सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ...

Use of fake bills | बनावट बिलांचा वापर

बनावट बिलांचा वापर

अहेरी : तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महा ई सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा ई सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा ई सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे.

बनावट बिलाचा वापर

गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार बनावट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

अगरबत्ती निर्मिती मजुरी वाढवा

गडचिरोली : वनविभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. त्यामुळे मजूर त्रस्त आहेत. काही मजुरांनी परवडत नसल्याने अगरबत्ती बनविण्याचे काम सोडून दिले.

गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गावरून कुरखेडा-शिरपूर बसचे आवागमन होते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे.

आलापल्लीत फवारणी करण्याची मागणी

आलापल्ली : येथील अनेक वॉर्डांतील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी वॉर्डांत डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी.

अहेरीत वाहतूक कोंडी

अहेरी : शहरातील बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणारे ग्राहकही रस्त्याच्या बाजूलाच दुचाकी वाहने पार्किंग करतात. त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

दोन बसेसची मागणी

अहेरी : शेकडो नागरिक दरदिवशी तेलंगणा राज्यात जातात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने तेलंगणासाठी दोन बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. कमलापूर परिसरात उमानूर, राजाराम, मरपल्ली, खांदला, रेपनपल्ली, तिमरम, गोविंदगाव, इंदाराम, रेगुलवाही या ग्रामपंचायती येतात. त्यामुळे दाेन बसेस सुरू करण्याची गरज आहे.

रुग्णवाहिकेची गरज

कमलापूर : कमलापूर हे गाव अतिसंवेदनशील, दुर्गम भागात असून, या परिसरात अनेक गावांचा समावेश आहे. येथे ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रेपनपल्ली, गुंडेरा, जिमलगट्टा यासह विविध परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात.

पोलीस चौकी सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवण्याची मागणी आहे.

अल्पवयीन बनले चालक

गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

पूल निर्मितीची मागणी

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले पडतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

भूमिअभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यात

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्र्कं डा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नाक्यावर अल्प कर्मचारी

गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Use of fake bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.