मातीमिश्रीत गिट्टी व रेतीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:38+5:30
सिरोंचा शहरात रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहरात विकास कामांना सुरूवात झाली आहे. मात्र कामाच्या दर्जाकडे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम केले जात आहे.

मातीमिश्रीत गिट्टी व रेतीचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्र.८ ते १० या वॉर्डात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मातीमिश्रीत रेती व निकृष्ट दर्जाच्या गिट्टीचा वापर होत असताना नगर पंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सिरोंचा शहरात रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहरात विकास कामांना सुरूवात झाली आहे. मात्र कामाच्या दर्जाकडे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदार आपल्या मनमर्जीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम केले जात आहे. सिमेंट काँक्रिट टाकण्याच्या पूर्वी बोल्डर गिट्टी टाकणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी काळी गिट्टी टाकली जाते. काळा दगड टणक राहत असल्याने रस्ता मजबूत होतो. मात्र कंत्राटदाराने सिरोंचात आढळणारे भुसभुसीत असलेले पांढरे दगड टाकले आहेत. या दगडावरून रोड रोलर फिरविल्यावर ते फुटून जात आहेत. तसेच या दगडांसोबतच मोठ्या प्रमाणात माती सुद्धा आहे. अशा निकृष्ट दगडामुळे काही दिवसांत रस्ता फुटण्याची शक्यता आहे. मातीमिश्रीत रेतीचाही सुद्धा वापर केला जात आहे. सदर काम नगर पंचायतीपासून हाकेच्या अंतरावर आहे. याच मार्गाने नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून काम केले जात असतानाही अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी डोळेझाकपणा करीत आहेत. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष अमित तिपट्टी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
तसाच पायंडा पडण्याची शक्यता
संबंधित कंत्राटदाराने मातीमिश्रीत रेती व कच्च्या दगडांचा वापर सुरू केला आहे. तरीही एकाही नगरसवेक किंवा अधिकाऱ्याने काम थांबविले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला बिलसुद्धा अदा केल्या जाईल. त्यामुळे अशाच प्रकारची रेती व गिट्टी इतरही कंत्राटदार वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट दर्जाचे दगड असल्याचे पाहताक्षणी लक्षात येते. या दगडांचा वापर घरासाठी सुद्धा नागरिक करीत नाही. येथे रस्त्यासाठी वापर केला जात आहे. एका कंत्राटदाराला सूट दिल्यास त्याच्याकडे बोट दाखवून असे निकृष्ट काम करण्यास इतरांनाही वाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर पंचायतीने आताच अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांना ब्रेक लावावा अशी अपेक्षा नगरातील नागरिक करीत आहेत.