युरिया खताचा पुरवठा होणार

By Admin | Updated: September 13, 2014 01:38 IST2014-09-13T01:38:00+5:302014-09-13T01:38:00+5:30

आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येऊन धानपिकासाठी युरिया...

Urea fertilizer supply will be done | युरिया खताचा पुरवठा होणार

युरिया खताचा पुरवठा होणार

गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येऊन धानपिकासाठी युरिया खताची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी विभागाने २ हजार ६०० मेट्रीक टन खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत उपलब्ध नसल्याच्या कृषी केंद्र चालकांच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे यांनी केले आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना पावसाने झटके देण्यास सुरूवात केली होती. पहिला पाऊस पडल्यानंतर तब्बल २५ दिवस पाऊस कायमचा गायब झाला होता. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. मध्यंतरी एक महिना पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प पडली होती. पावसाच्या या हेलकावे खाणाऱ्या प्रवृत्तीमुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली नव्हती. मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. धानपिकाला युरिया खत देण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये एकच गर्दी केली आहे.
खताचा काळाबाजार होऊ नये व प्रत्येक शेतकऱ्याला वाजवी किंमतीत खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याला २ हजार ६०० मेट्रीकटन युरिया खत उपलब्ध करून दिले आहे. सदर खत प्रति बॅग २९८ रूपये किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ७ कृषी केंद्रांमध्ये १४० मेट्रीक टन, आरमोरी तालुक्यातील २३ कृषी केंद्रांमध्ये २६२ मेट्रीक टन, चामोर्शी तालुक्यातील ४२ कृषी केंद्रांमध्ये ६०४ मेट्रीक टन, धानोरा तालुक्यातील ५ कृषी केंद्रांमध्ये ८० मेट्रीक टन, गडचिरोली तालुक्यातील २६ कृषीकेंद्रांमध्ये २९० मेट्रीक टन, कोरची तालुक्यातील ४ कृषीकेंद्रांमध्ये ३६ मेट्रीक टन, कुरखेडा तालुक्यातील १८ कृषीकेंद्रांमध्ये २८३ मेट्रीक टन, मुलचेरा तालुक्यातील ९ कृषीकेंद्रांमध्ये १०० मेट्रीक टन, सिरोंचा तालुक्यातील ४२ कृषी केंद्रांमध्ये ४०१ मेट्रीक टन, देसाईगंज तालुक्यातील १९ कृषीकेंद्रामध्ये ३२९ मेट्रीक टन, एटापल्ली तालुक्यात २० मेट्रीक टन व भामरागड तालुक्यात २० मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. कृषी केंद्र चालकांनी खताची साठाबाजी करू नये किंवा जादा दराने खताची विक्री करू नये, शेतकऱ्यांनी देखील जादा दराने खताची खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. खत विक्रीत गैरप्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी सभापती अतुल गण्यारपवार व कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Urea fertilizer supply will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.