कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत भामरागड प्रकल्पावर अन्याय

By Admin | Updated: June 29, 2017 02:02 IST2017-06-29T02:02:42+5:302017-06-29T02:02:42+5:30

आदिवासी विकास विभागाच्या निर्णयान्वये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर

Unjustification on Bhamragad Project in the transfer of employees | कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत भामरागड प्रकल्पावर अन्याय

कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत भामरागड प्रकल्पावर अन्याय

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : ३२ कर्मचाऱ्यांची बदली, केवळ सात रूजू
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आदिवासी विकास विभागाच्या निर्णयान्वये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. भामरागड प्रकल्पात कार्यरत तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची इतर प्रकल्पात बदली झाली. मात्र भामरागड प्रकल्पात बदली झालेले केवळ सातच कर्मचारी रूजू झाले. त्यामुळे भामरागड प्रकल्पात आता शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदांचा अनुशेष प्रचंड वाढला आहे. यामुळे आश्रमशाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अहेरी विधानसभा क्षेत्रात अहेरी व भामरागड असे दोन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचा समावेश आहे. अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आठ शासकीय वसतिगृह व १३ शासकीय आश्रमशाळा आहेत. भामरागड प्रकल्पात आठ शासकीय आश्रमशाळा असून चार वसतिगृह आहेत. यंदा काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अप्पर आयुक्त कार्यालयामार्फत आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अहेरी प्रकल्पाला येथून बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा नव्याने अधिक कर्मचारी मिळाले. मात्र अतिदुर्गम भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात बदली होऊन येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर बदली प्रक्रियेत ‘अहेरी प्रकल्प तुपाशी तर भामरागड प्रकल्प उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भामरागड प्रकल्पाला आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कर्मचारी बदली प्रक्रियेत सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याने भामरागड प्रकल्पाचा कारभार यंदाच्या शैक्षणिक सत्रात ढेपाळण्याची दाट शक्यता आहे. तोडसा आश्रमशाळेत गेल्या तीन वर्षांपासून महिला अधीक्षिका नव्हत्या. दोन महिन्यांपूर्वी येथे महिला अधीक्षिका रूजू झाल्या.

तीन वर्षांपासून शिक्षक नाही
भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या जांभिया येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गाची एकूण पटसंख्या १९० आहे. मात्र या आश्रमशाळेत मागील तीन वर्षांपासून नियमित माध्यमिक शिक्षक नाही. यापूर्वीच्या सत्रांमध्ये सर्व वर्ग मिळून एकूण विद्यार्थी पटसंख्या ४५० पेक्षा अधिक होती. शिक्षकांअभावी या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

रिक्तपदांबाबत अप्पर आयुक्त नागपूर यांच्यासोबत चर्चा केली आहे. यावर त्यांनी समायोजन प्रक्रियेतून नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून रिक्तपदे भरण्यात येईल, असे आश्वासन दिले. आपल्या प्रकल्पातून इतर प्रकल्पात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना भामरागड प्रकल्पात बदली होऊन आलेले कर्मचारी रूजू होईपर्यंत कार्यमुक्त करू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.
- एन.एस. मोरे, प्रभारी प्रकल्प अधिकारी, भामरागड

अहेरी प्रकल्पाला मिळाले झुकते माप
अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातून एकूण १४ कर्मचाऱ्यांची इतर प्रकल्पात बदली झाली. त्याऐवजी दुसऱ्या प्रकल्पातून अहेरी प्रकल्पात नव्याने २० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आले. समायोजनाने ११ कर्मचारी या प्रकल्पाला मिळाले आहेत.

 

Web Title: Unjustification on Bhamragad Project in the transfer of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.