कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले
By गेापाल लाजुरकर | Updated: August 13, 2023 21:20 IST2023-08-13T21:20:35+5:302023-08-13T21:20:44+5:30
सिराेंचा तालुक्यातील घटना

कालेश्वरला दर्शनासाठी गेलेले दाेन युवक गाेदावरीत बुडाले; सतर्कतेमुळे तिघेजण बचावले
गडचिराेली : गाेदावरी नदी तीरावरील कालेश्वर तीर्थस्थळावर दर्शन घेण्यासाठी गेलेले युवक नदीत आंघाेळ करताना खाेल पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न साेबतच्या युवकांनी केला; परंतु त्यांना यश आले नाही. नदीत बुडून दाेन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार १३ ऑगस्ट राेजी दुपारी सिराेंचा नजीकच्या गाेदावरी नदीत घडली.
हिमांशू अरूण माेन (२०) रा. नागपूर, सुमन राजू मानशेट्टी (१७) रा. आसरअल्ली ता. सिराेंचा अशी मृतकांची नावे आहेत. सुमन मानशेट्टी हा इयत्ता नववीत शिकत हाेता. तर नगरम येथील कार्तिक पडार्ला (१९ ) नवीन पडार्ला (२१) व रंजीत पडार्ला (२०) आदी तिघांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आले. गाेदावरी नदीत युवक बुडाल्यानंतर स्थानिक मासेमार, पाेलिस व एसडीआरएफच्या पथकाद्वारा शाेधमाेहीम राबवून सायंकाळी ५:३० वाजतापर्यंत त्यांचे शव हस्तगत करण्यात आले.
तेलंगणा राज्यातील कालेश्वर येथील देवस्थानात दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी हे युवक गेले हाेते. सदर घटनेची माहिती पाेलिसांना देण्यात आली. सिराेंचा पाेलिस व एसडीआरएफच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन मासेमारांच्या मदतीने शाेधमाेहीम राबवली. सायंकाळी ५:३० वाजता युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिराेंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास सिराेंचा पाेलिस करीत आहेत.
पाेहता येत नसल्याने झाला घात
कालेश्वर येथे दर्शन घेण्याकरिता जाण्यापूर्वी आंघाेळीसाठी युवक सिराेंचा तालुक्याच्या हद्दीतील गाेदावरी नदी पात्रात उतरले. यापैकी एक-दाेन युवकांना पाेहता येत नव्हते. आंघाेळ करताना मित्रांसाेबत ते खाेल पाण्यात गेले. यापैकी हिमांशू मून व सुमन मानशेट्टी हे अतिखाेलात गेल्याने ते बुडाले. तेव्हा इतर मित्रांनी व परिसरातील लाेकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न फळाला आले नाही. साेबतचे तिघेजण कसेबसे बाहेर पडले.