दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच नाही
By Admin | Updated: October 26, 2016 01:34 IST2016-10-26T01:34:22+5:302016-10-26T01:34:22+5:30
भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच नाही
धानोरा : भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या प्रेरकांना मागील दोन वर्षांपासून मानध देण्यात आले नाही. त्यामुळे प्रेरकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
धानोरा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये १२४ प्रेरकांची निवड करण्यात आली आहे. २०१२-१३ मध्ये या अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतिप्रेरक सहा हजार रूपये म्हणजेच दोन हजार रूपये महिना या दराने तीन महिन्यांचे मानधन दिल्या गेले. त्यानंतर एका वर्षानंतर दोन महिन्यांचे चार हजार रूपये मानधन दिले. डिसेंबर २०१५ मध्ये आठ महिन्यांचे १ हजार ६०० रूपये मानधन प्राप्त झाले. गटशिक्षणाधिकारी उचे यांच्याकडे मानधन देण्याबाबत डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत सतत पाठपुरावा केल्यानंतर ३१ मार्च २०१६ रोजी मानधनाचा धनादेश बँकेत पाठविला. १२४ प्रेरकांपैैकी ६९ प्रेरकांचे मानधन खात्यामध्ये जमा झाले. मात्र ५५ प्रेरकांच्या खात्यामध्ये मानधनच जमा झाले नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी उचे यांना विचारणा केली असता, बीडीओ बदलल्याने बँकेतील खाते बदल करण्यात आला नाही. त्यामुळे मानधन रखडले आहे, अशी माहिती दिली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ५५ प्रेरक मानधनापासून वंचित आहेत. पे्ररकांना दिवाळीपर्यंत मानधन मिळाले नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा तालुका प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सीताराम बडोदे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)