वन तस्करांना दोन वर्षांचा कारावास
By Admin | Updated: January 22, 2015 01:10 IST2015-01-22T01:10:33+5:302015-01-22T01:10:33+5:30
तस्करी करण्याबरोबरच वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वन तस्करांना दोन वर्षांचा कारावास
गडचिरोली : तस्करी करण्याबरोबरच वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
रामचंद्र अंकलू जिमडे (२७) व तिरूपती मलय्या जनगम (२३) रा. गोमलकोंडा ता. सिरोंचा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गोमलकोंडा जंगल परिसरातील ३०९ क्रमांकाच्या कंपार्टमेंटमध्ये २६ एप्रिल २००८ रोजी जवळपास १५ च्या संख्येत असलेल्या वन तस्करांकडून जंगलाची तोड केली जात असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनी पथकासह वन तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, वनतस्करांनी बैलबंडी ठेवून इंद्रावती नदीकडे पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी बैलबंडी व तोडलेले लाकूड ट्रकमध्ये टाकून आणत असताना पुन्हा वन तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर दगड फेक करून हल्ला चढविला. याबाबतची तक्रार आसरअल्ली पोलीस स्टेशनमध्ये वन कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर पोलिसांनी रामचंद्र अंकलू जिमडे व तिरूपती मलय्या जनगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा आज निकाल लागला असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांनी दोन्ही आरोपींना दोन वर्ष कारावास व ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)