वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर
By Admin | Updated: September 7, 2016 02:15 IST2016-09-07T02:15:00+5:302016-09-07T02:15:00+5:30
साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही.

वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर
नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर : साकोली-वडसा-गडचिरोली
विलास चिलबुले आरमोरी
साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात या राष्ट्रीय महामार्गाचे काम होण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोन वर्षांपूर्वी साकोली-वडसा-गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग होणार अशी घोषणा करण्यात आली होती. या महामार्गाच्या कामाला डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या रस्ते विकास विभाग गडचिरोली व भंडारा यांच्याकडे याबाबत माहिती घेतली असता, एक ते दीड वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार नसल्याचे समजते. वडसा-आरमोरीच्या मधोमध वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्यापही मिळालेली नाही. महामार्गाच्या रस्त्यालगत शेतकरी, जमिनधारकांना, दुकानदारांना जमीन हस्तांतरण करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. जर प्रशासनाने महामार्गालगतच्या जमिनीची माहिती मागितली असली तरी या बाबीचे केवळ सर्वेक्षणच सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. अलिकडेच या महामार्गाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. या महामार्गाचे नूतनीकरण भंडारा व गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार आहेत.
वडसा, आरमोरी, गडचिरोलीत होणार बायपास
राष्ट्रीय महामार्ग म्हणून साकोली-वडसा-गडचिरोलीची घोषणा झाली आहे. या महामार्गावर येणाऱ्या वडसा, आरमोर, गडचिरोली या तिन्ही गावांमध्ये बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. आरमोरी येथे बायपास मार्ग शहराच्या बाहेरून करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. वडसा येथेही दोन ते तीन प्रकारच्या बायपासबाबतचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार यावर विचार केला जाणार आहे. गडचिरोलीला सुद्धा बायपास काढता येतो काय, याविषयी चाचपणी करण्यात येत आहे. बायपास मार्ग झाला नाही, तर शहरातून होणारा रस्ता हा ११० फुटाचाच ठेवला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग १८० फुटाचा राहतो. मात्र घरांची पडझड होऊ नये यासाठी ही व्यवस्था करावी, असा लोकप्रतिनिधींचाही दबाव आहे. त्यातून हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. शहरामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असल्याची माहिती असून साधारणत: १५० वर्ष टिकेल, असा दावा बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.