वर्षभरात एका रस्त्याचे दोनदा खडीकरण
By Admin | Updated: January 25, 2015 23:14 IST2015-01-25T23:14:18+5:302015-01-25T23:14:18+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावापासून सात किमी अंतरावरील अहेरी मार्गावरील चंदनखेडी (वन) या फाट्यापासून ते चंदनखेडी गावापर्यंतच्या एक किमी रस्त्याचे एकाच वर्षात दोनदा

वर्षभरात एका रस्त्याचे दोनदा खडीकरण
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावापासून सात किमी अंतरावरील अहेरी मार्गावरील चंदनखेडी (वन) या फाट्यापासून ते चंदनखेडी गावापर्यंतच्या एक किमी रस्त्याचे एकाच वर्षात दोनदा खडीकरण करण्यात आले. यामुळे शासनाच्या लाखो रूपयाचा खर्च व्यर्थ गेला आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सदर प्रकार घडला असून या खडीकरण कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील वर्षात मार्च महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाच्या वतीने चंदनखेडी फाट्यापासून तर चंदनखेडी गावापर्यंतच्या एक किमी अंतराच्या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. या कामामध्ये शासनाचे १० लाख रूपये खर्च झाल्याची माहिती आहे. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीतच पुन्हा याच मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खडीकरण करण्यात आले. या कामावर १० लाख रूपयापेक्षा अधिक निधी खर्च झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. एका वर्षात एकाच रस्त्यावर दोनदा खडीकरणाचे काम करण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीला चुना लावण्यात आला आहे. एकीकडे आष्टी भागात अनेक गावांमध्ये अद्यापही पक्के रस्ते बांधण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे एकाच मार्गावर एकाच वर्षात दोनदा खडीकरणाचे काम करून जवळपास २० लाख रूपये खर्च झाल्यामुळे संबंधित विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. (प्रतिनिधी)