दोन लाखांचा सडवा जप्त, पोलीस, मुक्तीपथ व गाव संघटना पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 20:32 IST2018-06-11T20:32:08+5:302018-06-11T20:32:08+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला.

दोन लाखांचा सडवा जप्त, पोलीस, मुक्तीपथ व गाव संघटना पथकाची कारवाई
सिरोंचा (गडचिरोली) : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाळली जात असलेल्या मोहफुलाच्या व काळ्या गुळाच्या दारूसाठी तयार केलेला दोन लाखांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा तालुक्यातील नारायणपूरलगतच्या तीन गावांत सोमवारी करण्यात आली.
सिरोंचापासून १० किलोमीटवर असलेल्या नारायणपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या नारायणपूर, भोगापूर व कारसपट्टी या तीन गावांमध्ये पोलीस पथक, मुक्तीपथ अभियानाचे कार्यकर्ते आणि गाव संघटना पथकाने मिळून ही कारवाई केली. प्लास्टिकचे मोठे ड्रम आणि मातीच्या मडक्यांमध्ये भरून हा सडवा ठेवलेला होता. यावेळी ड्रममधील सडवा नष्ट करण्यात आला, तर मातीची मडकी फोडून टाकण्यात आली. घराच्या मागील बाजूने हे सर्व ड्रम तणसाने झाकून ठेवलेले होते. मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी लपवून ठेवलेली दारू हुडकून काढण्यासाठी मदत केली.
ज्या नागरिकांच्या घराच्या हद्दीत ही दारू ठेवलेली होती त्या चार जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यातील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले तर एक आरोपी महिला आजारी असल्यामुळे तिला अटक केली नाही. ही कारवाई सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत करण्यात आली.