दोन कोविड योद्धयांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:51+5:302021-05-15T04:34:51+5:30
आलापल्ली : कोविड कालावधीत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन कोविड योद्ध्यांना राज्यस्तरीय ‘कोविड योद्धा समाजरक्षक ...

दोन कोविड योद्धयांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक पुरस्कार प्रदान
आलापल्ली : कोविड कालावधीत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन कोविड योद्ध्यांना राज्यस्तरीय ‘कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान-२०२१’ पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार व पत्रलेखन संघाच्यावतीने दिनांक १२ मे रोजी झालेल्या ऑनलाईन झुम मिटिंगच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे व पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. विजयकुमार शहा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
त्यामध्ये गट साधन केंद्र पंचायत समिती, चामोर्शीचे साधनव्यक्ती चांगदेव सोरते व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, छल्लेवाडा येथील शिक्षक सुरजलाल लिंगाराम येलमुले यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे लाॅकडाऊनच्या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे तसेच कोविड परिस्थितीत स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न केल्याने या कामाची महाराष्ट्र पत्रकार संघाने दखल घेत त्यांची निवड केली होती. तसेच या दोन्ही कोविड योद्ध्यांनी कोरोना कालावधीत समाज जागृती, आर्थिक मदत, साहित्य वितरण, योग्य समुपदेशन केल्याने कार्य उल्लेखनीय ठरले आहे. साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले तर सुरजलाल येलमुले यांनी तेलगू, गोंडी, बंजारा, मराठी या भाषिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. या दोन्ही कोविड योद्ध्यांनी कोरोना महामारी असतानाही मुलांचे घरी जावून त्यांचे अभ्यास गट तयार करून घरोघरची शाळा निर्माण केली. शासनाच्या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. स्वाध्याय उपक्रम, गोष्टींचा शनिवार, कृतिपत्रिका, बालक दिन, महिला दिन यामध्ये मुलांचा सक्रिय सहभाग नोंदवला. वेध शिष्यवृत्ती, संपूर्ण वेबिनारमध्ये सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी, शाळेबाहेरची शाळा इत्यादी उपक्रम अधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राबविले.