टिप्पर उलटल्याने चालकासह दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:06 IST2018-04-30T23:06:27+5:302018-04-30T23:06:45+5:30
गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली. अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे.

टिप्पर उलटल्याने चालकासह दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली.
अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे. तर अविनाश उईके रा. सावंगी असे जखमी मजुराचे नाव आहे. तालुक्यातील बोटेकसा येथे रस्ता बांधकामाचे काम सुरू आहे. या कामावर चालक अमोल सहारे याने एमएच-३१ सीबी-३१९९ क्रमांकाच्या टिप्परने गिट्टी नेऊन टाकली. येथून रिकामे टिप्पर परत आणत असताना पुराडाजवळ नियंत्रण सुटल्याने टिप्परला अपघात होऊन टिप्पर उलटला. यामध्ये चालक अमोल सहारे व मजूर अविनाश उईके गंभीर जखमी झाले. दोघांनाही कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. वाहन चालकाचे नेमके कशामुळे नियंत्रण सुटले याची माहिती प्राप्त झाली नाही. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सदर टिप्पर देसाईगंज येथील प्रमोद कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे आहे.