आरमोरीत दोन सराफा दुकाने फोडली

By Admin | Updated: September 8, 2016 01:27 IST2016-09-08T01:27:33+5:302016-09-08T01:27:33+5:30

येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील सुमंगल ज्वेलर्स व न्यू दादा ज्वेलर्स या दोन सराफा दुकानासह

Two gold shops in the middle | आरमोरीत दोन सराफा दुकाने फोडली

आरमोरीत दोन सराफा दुकाने फोडली

चोरटे पसार : २ लाख १६ हजारांचा माल लंपास
आरमोरी : येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील सुमंगल ज्वेलर्स व न्यू दादा ज्वेलर्स या दोन सराफा दुकानासह पाईप फिटिंगचे दुकान असे एकूण तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर वाकवून फोडून दोन सराफा दुकानातील २ लाख १६ हजार २०० रूपयांचे सोने-चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.
आरमोरी येथील मुख्य बाजारपेठेतील अंकुश खरवडे यांच्या मालकीचे सुमंगल ज्वेलर्स तसेच राजू बेहरे यांच्या मालकीचे न्यू दादा बेहरे ज्वेलर्सचे दुकान आहे. तसेच सराफा लाईनमध्ये सुभाष चौकात जावेद हनिफ पोटीयावाला यांचे पाईप फिटिंगचे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिन्ही दुकाने फोडली. सुमंगल ज्वेलर्स दुकानाचे उजव्या बाजुकडील शटर व मध्यभागातील लॉकचे शटर अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पहारीने तसेच इतर वस्तूंच्या सहाय्याने वर वाकवून दुकानात प्रवेश केला. सुमंगल ज्वेलर्समधून एकूण १ लाख १८ हजार २०० रूपयांचे सोने-चांदीचे दागिणे व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआर मशीन, होम थेटर व सेटटॉप बॉक्स चोरून नेला. तसेच राजू बेहरे यांच्या न्यू दादा बेहरे ज्वेलर्स या दुकानातून पूर्वेकडी लहान शटर तोडून दुकानात प्रवेश करून काचेच्या शोकेसमधील १ लाख ५ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिणे असे एकूण दोन्ही दुकानातून २ लाख १६ हजार २०० रूपये किंमतीचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. तसेच जावेद हनिफ पोटीयावाला यांच्या पाईप फिटिंग दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. परंतु दुकानात काहीच रोख सापडली नाही.
घटनेची माहिती पोलिसांना सकाळी मिळताच त्यांनी चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी ७ वाजता श्वानपथक बोलावून अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना श्वान तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळापासून मार्ग काढत रामसागर तलावापर्यंत पोहोचले. परंतु आरोपींचा शोध लागू शकला नाही. तसेच अंगुली मुद्रा तज्ज्ञाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. अज्ञात आरोपींविरूद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पीएसआय जगदीश मोरे, नरेंद्र चर्जन, भीमराव बारसागडे करीत आहेत. (वार्ताहर)

दुसऱ्यांदा फोडले दुकान
पाच महिन्यांपूर्वी आरमोरी येथील सुमंगल ज्वेलर्सचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील सोने-चांदीचे दागिणे लंपास केले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्याच दुकानात चोरट्यांनी चोरी केली.

Web Title: Two gold shops in the middle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.