दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; पुनर्वसनासाठी मिळतील लाखो रुपये

By संजय तिपाले | Updated: January 8, 2025 17:36 IST2025-01-08T17:34:31+5:302025-01-08T17:36:50+5:30

दहा लाखांचे होते बक्षीस : दोघींवर ५३ गुन्ह्यांची नोंद, नक्षल्यांना आठवड्यातच दुसरा धक्का

Two fierce female Maoists surrender; lakhs of rupees will be given for rehabilitation | दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; पुनर्वसनासाठी मिळतील लाखो रुपये

Two fierce female Maoists surrender; lakhs of rupees will be given for rehabilitation

गडचिरोली :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर  वरिष्ठ कॅडरमधील ११ जहाल माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेऊन संविधानाचा मार्ग निवडला होता. यानंतर माओवाद्यांना दुसरा जबर धक्का बसला आहे. ८ जानेवारीला आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांनी शस्त्र म्यान करुन शरणागती पत्कारली. कंपनी क्र. १० ची सेक्शन कमांडर शामला झुरु पुडो उर्फ लीला (३६,रा. गट्टेपल्ली ता. एटापल्ली) व भामरागड दलम सदस्य  काजल मंगरु वड्डे उर्फ लिम्मी (२४,रा. नेलगुंडा) अशी त्यांची नावे आहेत. या दोघींवर मिळून तब्बल ५३ गुन्हे नोंद आहेत.

शामल पुडोवर महाराष्ट्र सरकारचे ८ लाखांचे तर काजल वड्डेवर दोन लाखांचे बक्षीस जाहीर झालेले होते. आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य सरकारकडून या दोघींना पुनर्वसनासाठी अनुक्रमे साडेपाच लाख व साडेचार लाख रुपये असे बक्षीस मिळणार आहे. १ जानेवारीला जहाल माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ ताराक्का हिच्यासह ११ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते. २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४६ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

नक्षलविरोधी अभियानचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक  नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या  ११३ बटालियनचे कमांडंट  जसवीर सिंग  यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण मोहीम सुरु आहे.

शामला होती २२ वर्षांपासून सक्रिय
शामला पुढे ही २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी सदस्या रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली.  पुढे २००७ पर्यंत तिने प्लाटून क्र. ७ मध्ये काम केले. २००७ मध्ये तिची बदली कंपनी क्र. ४ मध्ये झाली. २००८ मध्ये ती पीपीसीएम पदावर पदोन्नती घेऊन सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्र. ४ मध्ये आली. २०१०  मध्ये तिची कंपनी क्र. १० मध्ये बदली झाली. तेव्हापासून ती सेक्शन कमांडर या पदावर कार्यरत होती.  तिच्यावर ४५ गुन्हे नोंद असून यात २१ चकमक, ६ जाळपोळ व इतर १८ गुन्ह्यांचा समावेश आहे. 
       
काजलवर आठ गुन्ह्यांची नोंद
 काजल मंगरु वड्डे ही जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. याच दलममध्ये ती आतापर्यंत कार्यरत होती. कारकीर्दीत तिने ८ गुन्हे केले. यात ४ चकमक, १ जाळपोळ व ३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.  

Web Title: Two fierce female Maoists surrender; lakhs of rupees will be given for rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.