लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पित्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. यातील १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ एप्रिल रोजी सापळा रचून दोघांनाही रंगेहात पकडले.
मंगेश मनोहर आंबोरकर (४२, रा. शिवाजीनगर, गडचिरोली) आणि दिनेश कवडू सिडाम (३८, रा. बजरंगनगर, गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मंगेश हा प्रकल्प सहाय्यक (कंत्राटी), तर दिनेश हा कार्यालयीन सहाय्यक (कंत्राटी) म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराने आपल्या मुलीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी ३१ मार्च रोजी अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी मंगेश आंबोरकर याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. या व्यवहारात मध्यस्थी करत आरोपी दिनेश सिडाम याने २ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ एप्रिल रोजी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
एक हजार स्वीकारताच झडप घालून पकडले
मिळालेल्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने ३ एप्रिलला सापळा रचला. ठरल्याप्रमाणे १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने केली.
Web Summary : Gadchiroli: Two contract employees were caught accepting ₹1,000 bribe for a caste certificate verification. Anti-Corruption Bureau laid a trap and arrested both individuals red-handed. They demanded ₹5,000 initially. The ACB took action following a complaint.
Web Summary : गढ़चिरौली: जाति प्रमाण पत्र सत्यापन के लिए ₹1,000 रिश्वत लेते दो संविदा कर्मचारी गिरफ्तार। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने जाल बिछाकर दोनों को रंगे हाथों पकड़ा। उन्होंने शुरू में ₹5,000 की मांग की थी। शिकायत के बाद एसीबी ने कार्रवाई की।