तेंदूपत्त्याला मिळाला दुप्पट भाव
By Admin | Updated: April 13, 2016 01:33 IST2016-04-13T01:33:53+5:302016-04-13T01:33:53+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्त्याला जवळपास दुप्पट भाव मिळाला असून मार्च महिन्यातच पेसा अंतर्गत व नॉन पेसा मधील सर्वच युनिट विकल्या गेले आहेत.

तेंदूपत्त्याला मिळाला दुप्पट भाव
३,१०२ रूपये दर : राष्ट्रीयस्तरावर तेंदू बाजार तेजीत; वन विभागाच्या सर्वच युनिटची विक्री
दिगांबर जवादे गडचिरोली
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेंदूपत्त्याला जवळपास दुप्पट भाव मिळाला असून मार्च महिन्यातच पेसा अंतर्गत व नॉन पेसा मधील सर्वच युनिट विकल्या गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्याही उत्पन्नात दुप्पटीने भर पडणार असल्याने ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला असल्याने या तेंदूपत्त्याला राष्ट्रीयस्तरावर चांगली मागणी व भावही मिळते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी कंत्राटदारांमध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येत होती. मात्र मागील तीन वर्षात तेंदूपत्त्याच्या विक्रीत कमालीची मंदी आली होती. त्यामुळे कंत्राटदार तेंदूचे युनिट खरेदी करण्यास तयार नव्हते. मागील वर्षी वन विभागाने सुमारे ४३ युनिट विक्रीसाठी काढले होते. त्यांचा पाच वेळा जाहीर लिलाव करण्यात आला. मात्र त्यापैकी केवळ दहा युनिटची विक्री झाली होती व केवळ ६१३ रूपये प्रतिबॅग एवढा भाव मिळाला होता. याच क्षेत्राची पुनर्रचना करून वन विभागाने यावर्षी २६ युनिट तयार केले आहेत. हे सर्वच युनिट यावर्षी विकल्या गेले आहेत. विशेष म्हणजे प्रतिबॅग यावर्षी ९३४ रूपये एवढा भाव मिळाला आहे. पेसाअंतर्गत मागील वर्षी केवळ १ हजार ४८५ रूपये प्रति स्टँडर्ड बॅग भाव मिळाला होता. तर यावर्षी ३ हजार १०२ रूपये प्रतिबॅग एवढा सरासरी भाव मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट भाव मिळाला. त्याचबरोबर सर्वच गावांमधील तेंदू युनिटही वेळेपूर्वीच विकल्या गेले आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी कंत्राटदार तसेच मजुरांना पुरेसा वेळ मिळणार आहे. परिणामी तेंदूपत्त्याचे संकलनही अधिक होऊन ग्रामपंचायत तसेच वन विभागाला जास्तीचा लाभ मिळण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तेंदूपत्त्याची गोदामे झाली आहेत रिकामे
मागील तीन वर्षात तेंदूपत्त्याच्या व्यवसायात कमालीची मंदी आली होती. तेंदूपत्त्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होत होता. त्यामुळे मागील दोन वर्षात अनेक तेंदूपत्ता कंत्राटदारांना तोट्याचा सामना करावा लागत होता. परिणामी मागील वर्षी कंत्राटदार वन विभागाने ठरविलेल्या किंमतीतही युनिट खरेदी करण्यास तयार नव्हते. ही परिस्थिती संपूर्ण देशात होती. मागील दोन वर्षात कमी झालेल्या तेंदू संकलनामुळे तेंदूपत्त्याची गोदामे रिकामी झाली आहेत. तेंदूची मागणी वाढल्याने तेंदूला चढ्या दराने भाव मिळत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी यावर्षी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी उड्या घेतल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत संपूर्ण युनिट मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट दराने विकल्या गेली आहेत.