रोवणीदरम्यान शेताच्या बांधावरील सूर झाले लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:57+5:30

रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.

The tune on the field embankment disappeared during the planting | रोवणीदरम्यान शेताच्या बांधावरील सूर झाले लुप्त

रोवणीदरम्यान शेताच्या बांधावरील सूर झाले लुप्त

ठळक मुद्देलोकगीताची परंपरा; आधुनिकतेत ग्रामीण साज हरविला; बदलत्या काळानुसार गुत्ता पद्धती वाढली

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ‘चिकणल्या भुई माये, चिकणल्या भुई, इतका रोवणा रोवलो, माय तुझ्या सार भुई’ अशा शब्दात आपण उपसलेले सर्व कष्ट केवळ तुझ्या आशीर्वादामुळेच, असे नम्र निवेदन ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर लोकगीताच्या माध्यमातून धरतीला करीत असत. ताल, सूर व एका लयीत गाणे गावून रोवण्याचे काम पूर्ण केले जात होते. मात्र काळाच्या ओघात व आधुनिकतेच्या बदलात शेताच्या बांधावरील हे लोकगीताचे सूर आता लुप्त झाले आहे.
शेताच्या बांधावर पावसाच्या सरींसोबत गाण्याच्या सुरांची मुक्त उधळण व्हायची. या गीतातून ईश्वराचे स्मरण केले जायचे. हरिश्चंद्राच्या प्रामाणिकपणाचा दाखला देण्यासाठी चिलिया बाळ, भक्त प्रल्हाद, शिवशंकर, मातापिता यांचा जीवनगौरव असणारे लोकगीत एका तालासुरात शेताच्या बांधावर म्हटले जात होते. धृवपदाचा वारंवार उल्लेख होत असल्याने हे गीत ऐकणाऱ्याला व म्हणणाऱ्याला या गीताचा आघात वारंवार कानी पडावा, असे वाटत असे.‘राम चालले वनाचे वाटे, लक्ष्मण झाडे वाटेचे काटे’ असेही गाणे शेताच्या बांधावर गायले जात होते.
रोवणीनंतर दीपपूजा, नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन या सणाची मेजवानी राहत असते. रोवणीच्या मजुरीतून हाती आलेला पैसा ग्रामीण भागात या सणावर गोडधोड पदार्थ बनवून खर्च केला जात असायचा. आता मात्र या सणांबाबतचा ग्रामीण भागातील उत्साह कमी झाला आहे. रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.

रोवणी संपवण्याचा आनंद हरपला
पूर्वीच्या काळात आजच्या इतकी नांगरणी, चिखलणीची साधने उपलब्ध नव्हती. शेतकरी महिना, दीड महिना रोवणीच्या कामात खपायचा आणि रोवणा संपणे ही शेतकऱ्यांच्या त्या वर्षातील आनंदाची वेळ असायची. मग फणकर, नांगऱ्या, पेठकर तसेच रोवणीच्या कामात शेतात काम करणारे इतर मजूर हे रोवणा समाप्तीला एकमेकांना चिखल लावून आनंद साजरा करीत असत. शेतमालकाच्या घरापर्यंत वाजत-गाजत शेतीचे साहित्य पोहोचवून देऊन शेतमालकाकडून बक्षीस मागायचे. हे दिवस आता संपुष्टात आले आहे.

Web Title: The tune on the field embankment disappeared during the planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.