truck seized | आष्टीत ट्रकभर गुळ जप्त
आष्टीत ट्रकभर गुळ जप्त

ठळक मुद्देनऊ लाख रुपयांचा माल : अहेरीच्या दुकानदाराला केला जात होता पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी पोलिसांनी ट्रकभर गुळ जप्त केला आहे. या गुळाची किंमत ९ लाख रुपये व ट्रकची किंमत १९ लाख रुपये असा एकूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आष्टी येथील वनोपज नाक्यावर करण्यात आली.
ट्रक जप्त केल्यानंतर याची चौकशी केली असता, सदर गुळ छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील प्रथम ट्रेडर्सचे मालक हर्षद जैन यांनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील बन्सल ट्रेडींग कंपनीकडे बुक केला होता. कागदपत्रांवर धनलक्ष्मी ट्रेडर्स अहेरी यांच्याकडे माल पाठविला जात असल्याचे लिहिले होते. त्यानुसार आष्टी पोलिसांनी धनलक्ष्मी ट्रेडर्सचे मालक संतोष मंचार्लावार यांना बोलवून चौकशी केली असता, त्यांनी हा माल आपला नसल्याचे सांगितले. पुन्हा चौकशी केली असता, सदर माल लक्ष्मी अनाज भंडार अहेरी यांच्या नावाने असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत ट्रक चालक मोहम्मद हसन इस्लाम (४०), ट्रक क्लिनर मोहम्मद ताहीर नेहरूद्दीन ताहीर (२८) यांना अटक केली. चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी कलम १६१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची कारवाई पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जयदीप पाटील हे करीत आहेत. ट्रकमध्ये प्रत्येकी १९ किलो वजनाचे २ हजार ३११ बॉक्स आढळून आले.

Web Title: truck seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.